मुंबई (वार्ताहर) : गणेशोत्सवादरम्यान गणेश-भक्तांच्या सोयीसाठी बेस्टने पुढाकार घेतला आहे. बेस्टतर्फे २५ विशेष बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात मोठमोठ्या गणेशमंडळांसह घरगुती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईसह देशभरातील गणेशभक्तांचा वावर वाढलेला असतो. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे विशेष २५ बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशभक्तांना मुंबईतील विविध ठिकाणी भेट देणे सोयीस्कर व्हावे या दृष्टीने बेस्टतर्फे उपक्रम राबविला जात आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान या विशेष बसगाड्या रात्री ११.०० ते सकाळी ६.०० या कालावधीत दर एका तासाच्या अंतराने धावणार आहेत.
या बसगाड्यांचा मार्ग कुलाबा आगार ते वांद्रे बसस्थानक, ओशिवरा आगार ते सर जे.जे. रुग्णालय, विक्रोळी आगार ते सर जे.जे. रुग्णालय, शिवाजी नगर ते सर जे.जे. रुग्णालय, राणी लक्ष्मीबाई चौक ते कुलाबा आगार, माहीम बसस्थानक ते बोरिवली स्थानक (पश्चिम), राणी लक्ष्मीबाई चौक ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड), बॅकबे आगार ते धारावी आगार, माहीम बसस्थानक ते बोरिवली स्थानक (पूर्व) या मार्गांवर अधिक बस चालविल्या जातील. गणेशोत्सावा दरम्यान सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक बससेवेचा जास्तीस जास्त वापर करण्यासाठी आम्ही मुंबईकरांना प्रोत्साहित करीत आहोत, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
खुल्या दुमजली हेरिटेज टूर बससेवा
दक्षिण मुंबईत धावणार
गणेशोत्सवादरम्यान दक्षिण मुंबईत बेस्टतर्फे खुल्या दुमजली हेरिटेज टूर बससेवा चालविल्या जाणार आहेत. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा या विविध मंडळातील गणपती पाहण्यासाठी रात्रीच्या वेळेस ही हेरिटेज टूर बससेवा चालवली जाणार आहे.
या हेरिटेज दुमजली बसगाड्या रात्री १०.०० ते सकाळी ६.०० या वेळेत १ तासाच्या अंतराने चालविल्या जातील. या बससेवेची सुरुवात म्युझियम येथून गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट, महर्षि कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग आणि परत भायखळा, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चर्नीरोड, मरिन लाईन्स, मेट्रो सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुन्हा म्युझियमपर्यंत ही बससेवा हॉप ऑन हॉप ऑफ या पध्दतीने कार्यान्वित असेल. बसच्या अधिक माहितीसाठी प्रवाशांनी कृपया बेस्टच्या हेल्पलाईन क्रमांक १८२२७५५०(टोल फ्री) आणि ०२२-२४१९०११७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.