कल्याण (वार्ताहर) : महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अखंडित वीज सेवेसाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे आणि कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर सातत्याने आढावा घेऊन चालू बिलासह थकबाकी वसुलीबाबत आवश्यक सूचना देत आहेत. त्यानुसार कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर मंडलात क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कारवाईला गती देत आहेत. वारंवार विनंती करूनही वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या ४ लाख ५१ हजार ग्राहकांकडे ७० कोटी ७६ लाख तर तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ७२ हजार ५९५ ग्राहकांकडे २२ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.
वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहकांना सवलतीची संधी
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीत सवलत, व्याज व विलंब आकार माफी आणि पुनर्जोडणीची संधी देणाऱ्या ‘विलासराव देशमुख अभय योजनें’चा कालावधी ३१ ऑगस्टला संपणार आहे. कल्याण परिमंडलातील सुमारे ३ लाख २०० लघुदाब व उच्चदाब ग्राहक योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. संबंधित ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.