मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदा ही मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे १ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा अन्यथा स्कूल बस सेवा बंद करू, असा इशारा स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने दिला आहे.
सध्या मुंबईतील रस्त्यांवर केवळ खड्डेच दिसत आहेत, मात्र या खड्ड्यांमुळे स्कूल बस चालवण्याऱ्यांना देखील आता त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे स्कूल बस वेळेत पोहोचत नाही, दोन दोन तास स्कूल बसला उशीर होत आहे, तर विद्यार्थी देखील घरी अथवा शाळेत उशिरा पोहोचत आहेत, इतकेच नाही तर बसला ही तांत्रिक अडचणी येत आहेत, रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे बसच्या इंजीनमध्ये बिघाड होणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे स्कूल बस असोसिएशन कंटाळले असून याबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतला आहे.
दरम्यान स्कूल बस ऑनर्सची याबाबत बैठक झाली होती, बैठकीनंतर स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला असून १ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर १ सप्टेंबरपर्यंत जर खड्डे बुजवले गेले नाहीत, तर मात्र खड्डे असलेल्या रस्त्यांवर तात्पुरती स्कूल बस सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे, तसेच सगळ्या स्कूल बस बंद होणार नाहीत. खड्डे असलेल्या रस्त्यांबाबत हा निर्णय घेतला जाईल, मात्र याबाबत आधी विद्यार्थ्यांना पालकांसोबत चर्चा करून अथवा त्यांना माहिती देऊन बंद केल्या जातील, असे स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले आहेत.