Friday, October 17, 2025

दापोलीतील दोन रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

दापोलीतील दोन रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

मुंबई/नवी दिल्ली : दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने अखेर दिले आहेत.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या मागे ज्यासाठी ईडीची चौकशी मागे लागली ते साई रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला ३७ लाख ९१ हजार २५० रुपये तर साई रिसॉर्टला २५ लाख २७ हजार ५०० रुरये दंड ठोठावण्यात आला आहे. पर्यावरण तज्ञांच्या टीमने दापोलीतील मुरूड येथील या दोन्ही रिसॉर्टची पाहणी करून यासंबंधीचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर केला होता. या अहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २२ ऑगस्टला महाराष्ट्र कोस्टल मॅनेजमेंट अथॉरिटीचे सदस्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवले आहे.

सीआरझेड व ना विकास क्षेत्र यामध्ये हे बांधकाम केले असल्याने सीआरझेड कायदा २०११ चा भंग झाला आहे. त्यामुळे ही दोन्ही बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही दोन्ही बांधकामे तोडल्यानंतर त्याची पुनर्प्रक्रिया किंवा पुनर्वापरासाठी किंवा स्थानिक सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीने विल्हेवाटीसाठी सुरक्षितपणे वाहतूक करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास हे बांधकाम तोडण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे आणि सक्षम अधिकारी व तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली हे बांधकाम तोडण्यात यावे. तसेच आजूबाजूच्या वातावरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी वृक्षारोपण करून ते क्षेत्र विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment