नाशिक (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळाच्या वतीने दाखल करण्यात येत असलेल्या अर्जांवर आता प्रशासनाने प्रत्यक्ष निर्णय घेण्यास सुरुवात केली असून आत्तापर्यंत दोनच मंडळांना परवानगी दिली आहे, तर १९७ मंडळाचे अर्ज हे विविध कारणांनी फेटाळण्यात आले आहे.
सात दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे जोरदार तयारी करीत आहेत. यासाठी गणेश मंडळांना महापालिकेकडे अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, महापालिकेकडे एकूण ४१९ गणेश मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले होते. मात्र, यातून अवघ्या दोनच मंडळांना परवानगी मिळाली असून, तब्बल १९७ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर २२२ अर्जांची छाननी बाकी आहे.
आतापर्यंत नाशिक पूर्व विभागातून ७६ नाशिक पश्चिम विभागातून ७५ पंचवटीतून ९२ सिडको ९५ सातपूर ५० नाशिक रोड विभागातून ३१ अर्ज परवानगीसाठी प्राप्त झाले आहेत. महापालिकेने यंदा गणेश मंडळांना शुल्क माफी करून सुखद धक्का दिला आहे. महापालिकेने मंडप व स्टेज उभारणी परवानगीसाठी सहाही विभागांत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आतापर्यंत ४१९ मंडळांचे मंडप व स्टेज उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहे. परंतु, नाशिक पूर्व विभागाने केवळ दोन मंडळांना परवानगी दिली आहे. तब्बल १९७ अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर, २२२ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना, महापालिकेच्या कासवगती कारभाराचा फटका मंडळांना बसत असून, नियोजनाला फटका बसत असल्याचा आरोप मंडळांकडून करण्यात येतो आहे. महापालिकेकडून परवानगी देण्यास आडकाठी व दिरंगाई केली जात असल्याने गणेश मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.