मुंबई : इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नातील जास्तीत जास्त पैसे हे सीएनजी भरण्यासाठी जात असल्याने टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक १५ सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे २५ रुपये इतके आहे. त्यात १० रुपयांची वाढ करून ते ३५ रुपये इतके करावे, अशी युनियनची मागणी आहे.
भाडेवाढ व्हावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सरकार प्रशासनाकडे रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे करण्यात आली आहे. सरकार लक्ष देत नसल्याने ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. मुंबईतील टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे, तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.