सिडको (प्रतिनिधी) : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेखानगर परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जवळपास २०० ते ३०० हिंदू महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांना धर्मांतरासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली जात असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही माहिती मिळताच शिंदे गटातील पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या माध्यमातून आयोजकांचा डाव हाणून पाडला.
मंगळवारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांतर करण्यास विरोध असल्याचे आणि तसा कायदा सक्तीने राबविण्याचे स्पष्ट केल्यानंतरही त्याच दिवशी संध्याकाळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्याचा डाव उधळण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मांतर केल्यास कसे साक्षात्कार होतात, दुर्धर आजार कसे बरे होतात, असे भासवत उपस्थित हिंदूंना धर्मांतरासाठी प्रेरित केले जात होते. देशासह राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वहिंदू परिषद यांसारखे राजकीय पक्ष व संघटना हिंदूंच्या संघठनासाठी सातत्याने प्रयत्नशील असताना नाशिक शहरात हिंदूंच्या धर्मांतराचा सुरू असलेला छुपा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.
शहराच्या उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हिंदूंच्या धर्मांतरासाठी प्रत्येक रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अशाच एका शिबिरात काही विशिष्ट लोकांना स्टेजवर उभे करून त्यांना असलेले गंभीर आजार आणि त्यांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या धर्माच्या देवामुळे त्यांची त्या गंभीर आजारातून विनाऔषधे किंवा विनाशस्त्रक्रिया कशी सुटका झाली, हे उपस्थित महिला व पुरुषांना सांगितले जात होते. या संपूर्ण धर्मांतराच्या प्रक्रियेसाठी एका विशिष्ट समाजातील लोकांना तसेच, आर्थिक कमकुवत व अशिक्षितांना हेरून आर्थिक मदत, मोफत अन्नधान्य देण्याचे आश्वासन देत त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
धर्मांतराच्या घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत. पण, आता असे प्रकार शहरी भागातही सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली असून, या प्रकरणात लवकरच धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांचा शक्तींचा लवकरच बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकारी लक्ष्मीकांत यांनी सांगितले की हिंदूंची संख्या कुठेतरी कमी करण्याचा काही धर्मविरोधी गटाचा एक भाग झालेला आहे सातत्याने हिंदूंना धर्मांतर करण्यास वेगवेगळे आमिषे दाखवले जातात आणि त्या माध्यमातून त्यांचे धर्मांतर केले जाते शहराच्या इंदिरानगर सारख्या मध्यवर्ती लोक वस्तीमध्ये असे धर्मांतरांचे प्रकार घडले हे धक्कादायक बाब आहे यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.