महाड (वार्ताहर) : निमशहरी व ग्रामिण भागात ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत चुकीच्या पद्धतीच्या मीटर रिडिंगमुळे वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये ठेकेदार कंपनीकडून जाग्यावर न जाताच रिडींग घेणे, चुकीचे रिडींग नोंदवण्याचे प्रकार सुरु आहेत. महाड शहरातील एका ग्राहकाला याचा अनुभव आला असून संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाडमध्ये नवेनगर परिसरात राहणारे संदीप महाडीक यांच्या जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेले मीटर रिडींग हे चुकीचे असल्याचे लक्षात आले. एजन्सीकडून मीटर रिडींग घेतल्यानंतर ८ ते १० दिवसात ग्राहकाला विज बिल मिळत असते. महाडीक यांना त्यांचे विज देयक मिळाले त्यावेळी त्यांनी आपल्या मीटरचे रिडींग घेतले असता, ते १२५८ इतके होते. मात्र एजन्सीकडून १० ते १५ दिवस अगोदर घेतलेले रिडींग हे १२७८ होते. याचा अर्थ १५ दिवसापूर्वीचे रिडींग हे १२५८ पेक्षा कमी असायला हवे होते, अशा पद्धतीने चुकीचे रिडींग घेऊन ग्राहकांना देयके पाठवण्याचे प्रकार एजन्सी मार्फत सुरु असून त्याचा नाहक फटका वीज ग्राहकांना बसत आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी महाडीक यांनी केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे महाड येथील उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर एजन्सीला समज देण्यात आली होती. त्यानंतर असे प्रकार कमी झाले आहेत. यापूर्वीच्या एजन्सीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले होते, असेही केंद्रे यांनी सांगितले.