
मुंबई : गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
उत्सवकाळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ज्या वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त असणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांचा समावेश असणार आहे. याशिवाय पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरुन होणाऱ्या वाळूच्या ट्रक, ट्रेलरच्या वाहतुकीबाबतदेखील मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९१५ मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन आदेश जारी केले आहे.
ही वाहने वगळली
अवजड वाहनांच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांना वगळण्यात आले आहे.
कोकणी लोकांसाठी गणेशोत्सव हा सर्वाधिक मोठा उत्सव आहे. यानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील बहुतांश चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय असते. त्यात जर एखादे अवजड वाहन बंद पडले तर, त्याचा परिणाम सर्व वाहतूकीवर होतो आणि कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.