मुंबई : आमच्या आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रकार काही जणांकडून झाला. त्यांचा गैरकारभार आम्ही मिडीयासमोर सांगत असल्याने त्यांना ते सहन झाले नाही, असे शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या विचारधारेवर पडलेला काळा डाग असल्याचे वादग्रस्त वक्तव्यही महेश शिंदे यांनी केले आहे.
विरोधकांना लवासाचे खोकेंच्या घोषणा सत्य घोषणा असल्याने त्यांना त्या कटू वाटल्या. त्यांनी सगळ्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. आमचे मीडियासमोर आंदोलन सुरू असताना गाजर घेऊन येत अर्वाच्च भाषा काही सदस्यांनी वापरली. अमोल मिटकरी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचाराचा काळा डाग असल्याची खोचक टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
सर्वांनी त्यांचे आजचे वर्तन पाहिले, त्यांनी सर्वप्रथम आम्हाला ढकलले, मिटकरी हे लोकशाहीवादी नेते नाहीत, ते जहाल आणि चुकीच्या विचाराचे नेतृत्व असल्याचे शिंदे यांनी म्हटले. मिटकरींसारख्या लोकांमुळे लोकशाहीला धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली, सत्य कटू असल्याने त्यांना पचले नाही. विरोधकांना आमच्या घोषणा सहन झाल्या नाही. बारामतीला गेलेले आणि लुटलेले पैसै बघा, असे महेश शिंदेंनी म्हटले आहे. विरोधकांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली आम्ही केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक आहोत, असे आमदार महेश शिंदेंनी म्हटले आहे.