मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १० एसी लोकल सुरू केल्या. मात्र या एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांना उलट त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्याची दखल घेत या एसी लोकल उद्या गुरुवार २५ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू केल्यामुळे सामान्य लोकलच्या वेळा बदलल्या होत्या. यामुळे सकाळी कामावर जाताना आणि विशेष म्हणजे संध्याकाळी कामाहून घरी परतताना मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी होत होती. यामुळे लांब पल्ल्याला राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला गेला.
संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि बदलापूर येथील रेल्वे प्रवाशी संघटनेने याबाबत बदलापूर स्थानकावर गोंधळ घातला होता तसेच याबाबत अनेक निवेदन देखील रेल्वेला देण्यात आली आहेत. तर आपापल्या भागातील नगरसेवकांना भेटून देखील निवेदन दिली गेली. जेणेकरून ते निवेदन रेल्वे पर्यंत पोहचेल. या निवेदनात एसी लोकल बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच खोपोली, बदलापूर येथे रेल्वेसेवा वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
याची दखल घेत या एसी लोकल उद्या गुरुवार २५ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या १० एसी सेवा सध्याच्या वेळापत्रकानुसार नॉन-एसी सेवा म्हणून चालवल्या जातील. एसी लोकल पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळवली जाईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.