मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्येत सध्या चढउतार सुरू असतानाच मुंबईत साथीचे आजार वाढले आहेत. त्यात ‘स्वाइन फ्लू’ने सध्या थैमान घातले असून मलेरिया आणि डेंग्यूची रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबईत पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. मुंबई महापालिकेने यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी सध्या मुंबईत गेल्यावर्षीच्या तुलनेत ‘स्वाइन फ्लू’चा कहरच पाहायला मिळत आहे.
ऑगस्टच्या २१ दिवसांत मुंबईत १६३ ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात संपूर्ण जुलैमध्ये १०५ रुग्ण आढळले होते. दरम्यान गेल्या संपूर्ण वर्षात केवळ ६४ ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळले होते तर यावर्षी जानेवारी ते २१ ऑगस्टपर्यंतचा विचार करता २७२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ऑगस्टच्या १ ते २१ तारखेपर्यंत मलेरियाचे ५०९ तर डेंग्यूच्या १०५ रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या वाढली आहे. गॅस्ट्रोचे रुग्णही २१ दिवसांत ३२४ झाले आहेत.
दरम्यान ६ जणांचा विविध आजारांनी मृत्यू झाला असून एच पूर्व वॉर्ड येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणांचा लेप्टोस्पायरेसीने ४ जुलै २०२२ रोजी मृत्यू झाला तर मलेरियाने ५५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर डेंग्यूने ८ वर्षीय मुलीचा तर ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ४२ वर्षीय आणि ४४ वर्षीय नागरिकांचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला आहे. दरम्यान साथीच्या आजारांची कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दीत जाणे टाळावे, शिंकताना नाकावर रुमाल ठेवावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
१ ते २१ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी
आजार रुग्ण
मलेरिया – ५०९
लेप्टो – ४६
डेंग्यू – १०५
गॅस्ट्रो – ३२४
हेपेटायसिस – ३५
चिकनगुनिया – २
एच १ एन १ – १६३
१ जानेवारी ते २१ ऑगस्टपर्यंत आकडेवारी
आजार रुग्ण मृत्यू
मलेरिया – २३१५ १ मृत्यू
लेप्टो – १४६ १ मृत्यू
डेंग्यू – २८९ २ मृत्यू
गॅस्ट्रो – ३९०९
हेपेटायसिस – ३५३
चिकनगुनिया – ९
एच १ एन १ – २७२ २ मृत्यू