नाशिक (प्रतिनिधी):अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या पोळा सणासाठी बळीराजाची मोठी लगबग सुरू झली आहे. श्रावणी अमावस्या अर्थात बैलपोळ्यासाठी बळीराजा सोबत सामान्य जनताही सणासाठी उत्सुक असते. या सणाला बैलांची मिरवणूक काढून वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जाराजासाठी खास पुरणपोळीचा बेत केला जातो. मिरवणुकीवेळी गावभर मिरवले जाते. त्यावेळी घराघरातून बैलांची पूजा करून नैवेद्य दाखविला जातो.
बळीराजाचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने बैल किंवा शेतात राबणाऱ्या सर्जाराजाचा सण उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा व्हावा, अशी बळीराजाची इच्छा असते. त्यामुळे बाजारात बैलपोळ्यासाठी विविध सजावटीचे साहित्य खरेदी केले जात असल्याचे चित्र आहे. बैलपोळ्याला सजविण्यासाठी विविध साहित्य माथट, मोखडी, कासरा, शेंब्या, वेसन, शिंगांचे गोंडे, रंग, दोरी, झूल, पितळी तोडे, साखळी, ऑइलपेंट रंग, घुंगरू, केसारी, चवर आदी विक्रीस उपलब्ध आहेत. दर यंदाही स्थिर आहेत. शेती आणि बैलपोळ्याच्या सजावटीसाठी पूर्वीइतकी मागणी नसल्याने माल कमी प्रमाणात विक्रीस ठेवला आहे. शहरातील बोहोरपट्टी, कानडे मारुती लेन, नाशिकरोड, पंचवटी येथे बैलांच्या सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. बैलांच्या सजावटीचे साहित्य शहर तसेच मालेगाव, बऱ्हाणपूर येथून येत असते.
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या भागीदार म्हणून बैलाकडे बघितले जाते तसेच तो शेतकरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्याचे पालन पोषण केले जाते. त्याच्या कृतज्ञतेपोटी पोळ्याच्या दिवशी त्यांना पूर्ण आराम देऊन संध्याकाळी अंघोळ तसेच साजशृंगार करून मिरवणूक काढली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्जाराजाप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. यावर्षी सजावटीच्या वस्तूंचे बाजार स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आनंदाच्या वातावरण आहे.