शिबानी जोशी
प्रखर राष्ट्रीय विचार आपल्या कार्यातून दर्शविणारे, संघासाठी, देशासाठी आयुष्य वेचणारे अनेक आदर्श आहेत. त्यांचा आदर्श लोकांसमोर राहावा. यासाठी त्यांच्या पश्चात संघ कार्यकर्त्यांनी ज्या सामाजिक संस्था उभ्या केल्या त्यांना या आदर्शांची नावे दिली आहेत. अशा आदर्शच्या नावाने त्यांच्या पश्चात अनेक संस्था, संघटना उभ्या राहिल्या आहेत. रामभाऊ म्हाळगी एक असच व्यासंगी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. १९७७ आणि १९८० साली दोन वेळा जनता पार्टीचे खासदार म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. ठाण्यातील संघ कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा घनिष्ट संबंध होता. संघाच्या मुशीतून घडलेले प्रचारक, जनसंघाचे पहिले सरचिटणीस व आमदार, जनता पक्षाचे खासदार असा राजकारणातील पक्षनिहाय प्रवास करत अखेर ते भारतीय जनता पक्षात स्थिरावले. या सर्व पक्षांतील विविध पदे त्यांनी भूषवली. राजकारणातील ही संपूर्ण वाटचाल त्यांनी संघाच्या संस्कारांशी इमान राखत केली.
रामभाऊ म्हाळगी यांचा अभ्यासू लोकप्रतिनिधी असा लौकिक होता. रामभाऊ विधानसभेत आमदार म्हणून महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले की, सर्वजण अगदी विरोधी पक्षातील सदस्य ही लक्षपूर्वक त्यांच भाषण ऐकत असत. जनतेच्या समस्यांना आपल्या वैचारिक, चिंतनशील विचारधारेतून वाचा फोडणाऱ्या रामभाऊ म्हाळगी यांना ६ मार्च १९८२ रोजी जरा लवकरच काळाने हिरावून नेले. ठाणेकर नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या लोकप्रतिनिधीचे उचित स्मारक ठाण्यात व्हावे, अशी समस्त कार्यकर्त्यांची उत्कट इच्छा होती. मात्र त्यांचा पुतळा उभारणे किंवा एखाद्या रस्त्याला त्यांचे नाव देणे शक्य होत. पण तशापेक्षा अभ्यासू, व्यासंगी वक्त्यांची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी त्यांच्या नावे ठाण्यात वैचारिक व्यासपीठ उभे करणे अधिक औचित्याचे ठरेल, अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यावर वेगवेगळ्या स्तरावर विचारमंथन झाले. अखेर भाजपचे ठाणे जिल्हा संघटन मंत्री कै. अरविंद पेंडसे, वसंतराव पटवर्धन यांनी युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष आमदार संजय केळकर, शरद पुरोहित यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून ‘रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाले’ची संकल्पना निश्चित केली. नंदाजी रानडे, विजय जोशी, सुभाष काळे, आनंद वैद्य, विष्णू रानडे या सर्व तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी या विचारयज्ञाची जबाबदारी स्वीकारली आणि गेली पस्तीस वर्षे ती उत्तमरित्या पेलली. कालांतराने यात सामाजिक कार्यकर्ते सुहास जावडेकर, टीजेएसबी बँकेचे चेअरमन विद्याधर वैशंपायन, लेखिका माधुरी ताम्हणे, प्रा. कीर्ती आगाशे, समुपदेशक नंदिनी गोरे, व्याख्यात्या धनश्री लेले ही जोडले गेले.
८ जानेवारी १९८७ सालच्या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रापासून निश्चित केलेल्या या संकल्पनेचे स्वरूप आजवर टिकून आहे. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या हेतून आकाराला आलेली ही व्याख्यानमाला शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक करण्यावर सुरुवातीपासून कटाक्ष आहे, असे व्याख्यानमालेचे अध्यक्ष आ. संजय केळकर सांगतात. खासदार रामभाऊ म्हाळगी हे आदर्श लोकप्रतिनिधी. व्यक्तिशः माझे महाविद्यालयीन जीवनापासून आदर्श होते. त्यांच्या संस्कारांनुसार या व्याख्यानमालेचे नियोजन होत असते. त्यामुळेच दूरदर्शन व मोबाइल यांचे प्राबल्य असलेल्या या युगांतही ठाणेकर रसिक श्रोते आणि तरुणवर्ग ही या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद देत आहेत, असं संजय केळकर यांनी आवर्जून सांगितले.
आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानमाला चालतात; परंतु विविध क्षेत्रांतले विचारवंत, मान्यवर यांना अचूक निवडून लोकांसमोर मांडणे आव्हानात्मक काम आहे. ते या व्याख्यानमालेन गेली ३५ वर्षे यशस्वी करून दाखवले आहे. मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात तरुणांना सर्व उपलब्ध असतानाही मोठ्या संख्येने तरुण वर्ग या व्याख्यानमालेला येतो यावरूनच ते लक्षात येते. दर वर्षी वर्षाच्या सुरवातीला ८ किंवा ९ जानेवारी रोजी रात्री ठीक ८ ते १० या वेळात व्याख्यानमालेची सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी मनोरंजन क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीने व तिळगूळ वाटपाच्या व्याख्यानमालेचा समारोप होतो. रामभाऊ म्हाळगी जसे वेळेचे पक्के होते त्याला अनुसरूनच ठीक वेळेत थोडाही विलंब न होता व्याख्यानं सुरू होतात. हेही या व्याख्यानमालचे खास वैशिष्ट्य आहे.
विचारी,उमद्या, रसिक ठाणेकर रसिकांच्या उदंड उपस्थितीत व्याख्यानमालेची सर्व सत्रे संपन्न होतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मनोहर जोशी, य. दि. फडके, लालकृष्ण अडवाणी, राम जेठमलानी, प्रमोद महाजन, देवेंद्र फडणवीस अशा विविध विचारधारेच्या मान्यवरांनी या व्यासपीठावरून आपले प्रगल्भ विचार व मते मांडलेली आहेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, अध्यात्म, आरोग्य, क्रीडा व मनोरंजन अशा सात विषयांतील तज्ज्ञांची सात दिवस व्याख्याने होतात. पहिल्याच वर्षी भूमकर सर, विद्याधर गोखले, प्रमोद नवलकर यांनी हजेरी लावली. त्याला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सुषमा स्वराज, शिवाजीराव भोसले, अरुण साधू, गंगाधर गाडगीळ, कर्नल श्याम चव्हाण, द. मा. मिरासदार, अण्णा जोशी, अशोक जैन, माधवराव गडकरी, नरेंद्र जाधव, राजू शेट्टी व अच्युत गोडबोले अशा असंख्य मान्यवरांचा समावेश आहे. सात दिवस देशभरातून विविध वक्ते येत असल्यामुळे कधीतरी अडचणीचे प्रसंगसुद्धा आले आहेत. ‘एकदा सिकंदर बख्त यांचे विमान भोपाळ येथे अडकले आणि ते पोहोचू शकत नाही हे लक्षात आले. तातडीने तत्कालीन आमदार प्रकाश जावडेकर यांना व्याख्याते म्हणून पाचारण करण्यात आले व त्यांनी हीहे आमंत्रण स्वीकारले होते. संगीत क्षेत्रातील हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, महेश काळे, अवधूत गुप्ते, आशाताई खाडिलकर, पद्मजा फेणाणी यांच्या मुलाखतींनी रंगत आणली आहे. अविनाश धर्माधिकारी, विठ्ठल कामत, जगन्नाथ दीक्षित, द्वारकानाथ संझगिरी, मीरा बोरवणकर, मोहन जोशी ही येऊन गेले आहेत.
कोरोना काळातही व्याख्यानमालेत खंड पडला नाही. मोजक्या निमंत्रितांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती आणि दूरदूरच्या असंख्य श्रोत्यांनी दररोज यूट्यूबच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचा आनंद लुटला होता. गेल्या पस्तीस वर्षांत ठाणेकरांनी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. मात्र व्याख्यानमालेवरील श्रोत्यांचे प्रेम तिळभर उणावले नाही. पस्तीस वर्षांपासून प्रत्येक व्याख्यानमालेला नियमित हजेरी लावणारे प्रकाश फडके व सध्या वाई येथे स्थायिक असलेले व तिथून व्याख्यानांना येणारे देवीदास घोटवडेकर असे काही प्रेक्षक सलग येतात, हे कळल्यानंतर त्यांचाही समितीने आवर्जून सत्कार केला आहे. व्याख्यानमालेमुळे श्रोत्यांना वैचारिक खाद्य तर मिळतच. पण आणखी एक समाजकार्यही घडत. सिंधुताई सपकाळ, डॉक्टर अभिजीत सोनवणे अशा समाजसेवकांच्या संस्थाचे कार्य ऐकल्यानंतर या संस्थांना इथून जाताना उत्स्फूर्तपणे भरघोस आर्थिक मदत मिळत असते. वैचारिक खाद्य, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेने ठाण्यातील संपन्न सांस्कृतिक केंद्र असा लौकिक प्राप्त केला आहे. मोबाइल, यूट्यूब, ट्विटर, गुगलमधून माहितीचा लोट वाहत असतानाही प्रत्यक्ष व्याख्यान ऐकण अजूनही लोकांना रुचतं तसेच तरुणांनाही ते ऐकावसं वाटतं यातच या व्याख्यानमालेच यश आहे. दर्जेदार, प्रगल्भ विचार ऐकायला मिळत राहावे यासाठी अशा व्याख्यानमाला सुरू राहणेही गरजेचे आहे.