मुंबई : दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या संदेश दळवी या २२ वर्षीय गोविंदाचा अखेर नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. दहीहंडीला तो जखमी झाला होता. त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिली.
यंदा सर्वत्र मोठ्या जल्लोषात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवादरम्यान, १५० हून अधिक गोविंदा जखमी झाले. अनेकांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर काहींवर उपचार सुरु होते. त्यापैकीच विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश सातव्या थरावरुन खाली कोसळला. त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मुंबईतील कूपर रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती.
दहिहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विलेपार्ले पोलीस ठाण्यात हा गुन्हा आयोजकांवर शनिवारी दाखल करण्यात आला होता. विलेपार्ले पूर्व येथे वाल्मिकी चौक येथे रियाज शेख याने दहिहंडीचे आयोजन केले होते. मात्र गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेता, कोणतीही साधनसामग्री पुरवली नाही. यावेळी विनय शशिकांत रांबाडे (वय २० वर्ष) संदेश प्रकाश दळवी, वय २४ वर्षे हे दोघेजण दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
१० लाख रुपयांची मदत देणार : गिरीश महाजन
मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूबाबत बोलताना राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, दहीहंडी फोडताना सातव्या थरावरुन मुलगा खाली कोसळला होता. त्याच्या मानेला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. गोविंदाचे प्राण गमावणे ही दूर्दैवी घटना असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले. तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, त्याच्या घरची परिस्थिती पाहून आणखी काही मदत करता येईल का? याबाबत देखील विचार करु, असेही त्यांनी स्पष्ट केले. आयोजकांनी नियमावलीचे पालन केले की, नाही याची देखील चौकशी करू, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
गोविंदाच्या मृत्युचे कोणी राजकारण करू नये : प्रवीण दरेकर
गोविंदाच्या मृत्यूचे कोणीही राजकारण करु नये. सरकार संवेदनशील आहे. गोविंदांना १० लाखाचा विमा पहिल्यांदा देण्यात आला आहे. ही सर्व मदत सरकार देणार आहे. गोविंदाच्या मृत्यूचे भांडवल म्हणजे, मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का? ठाकरे साहेबांची शिवसेना हे चुकीचे करतेय, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.