Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरगणेशोत्सवाची वसईच्या बाजारात धूम! फेटे, मोत्यांच्या माळांना अधिक पसंती

गणेशोत्सवाची वसईच्या बाजारात धूम! फेटे, मोत्यांच्या माळांना अधिक पसंती

वसई (प्रतिनिधी) : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना त्यांची धामधूम आतापासूनच मार्केटमध्ये पहायला मिळत आहे. अनेक गणपतीच्या मूर्ती कारखान्यांमध्ये शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त् आहेत. तर यंदा गणेशोत्सवात रंगीबेरंगी कापडी फेटे, नेसविलेले धोतर यासह हिरेजडित मूर्ती भाविकांना भावल्या असल्यामुळे त्यांची मागणीही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

मात्र कोरोना नंतर तसेच जीएसटीमुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने भाविकांच्या खिशाला देखील मोठी कात्री लागत आहे.
मागील दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव एकदम साधेपणाने साजरा झाला होता. मात्र यंदा सर्व निर्बंध शिथिल झाल्याने यंदाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. फेटा हा महाराष्ट्रात रुबाबदारपणाचे प्रतीक म्हणून असल्यामुळे त्याचा वापर मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी केला जात आहे. पैठणी, जरीचे कापड अशा विविध रंगांचे कापड घेऊन हे फेटे तयार करून मूर्तीची सजावट केली जात आहे.

याशिवाय कापडी धोतर नेसविले जात आहे. त्यावर आकर्षक असलेल्या कलाकुसरीमुळे फेटे व धोतर अधिकच मूर्तीची शोभा वाढवीत असल्याने अनेकजण अशाच मूर्तीना पसंती देत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी मुकुट व गणेशाच्या अंगावरील आभूषणे ही हिरेजडित करवून घेतली जात आहे. हिरे लावण्याचे काम हे अधिक बारकाईने करावे लागत आहे. एका मूर्तीला तयार करण्यासाठी साधारणपणे अर्धा ते एक दिवस इतका कालावधी जातो. मूर्ती मोठी असेल व त्यातील काम जास्त असेल तर दोन दिवस लागतात असे सांगण्यात येत आहे.

वसई, विरारमध्ये विविध भागात गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. यावर्षी शासनाने घरगुती व सार्वजनिक अशा गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळेच वसईच्या विविध चित्रशाळेत शाडू मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस अशा गणेश मूर्ती तयार करण्याच्या व त्यांना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्राहक ही गणेशमूर्तींची नोंदणी करण्यासाठी कलाकेंद्रात येऊ लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणच्या चित्रशाळेत ६० टक्क्याहून अधिक नोंदणी झाली आहे. तसेच यावर्षी मूर्तीच्या किंमतीत ही पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -