उल्हासनगर (वार्ताहर) : ‘जलकुंभ उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती उल्हासनगरच्या मराठा सेक्शन विभागाची झाली आहे. कारण या ठिकाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे हजारो नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता याविरोधात भाजप कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येत आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठा सेक्शनच्या जिजामाता चौकात जलकुंभ आहे. याच ठिकाणावरून येथील कॅम्प नंबर ४ परिसरातील अनेक भागाला पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभ भरण्याची क्षमता ही ५ मीटर आहे. परंतु असे न होता फक्त दररोज २ ते ३ मीटर पाणी भरले जाते. त्यामुळे येथील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही. तसेच दर शुक्रवारी येथील पाणी पुरवठा बंद केला जातो, या स्वरूपाच्या अनेक समस्या येथील स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे.
याविषयी भाजपचे स्नेहल राणे, शीला मनसुलकर, सुनील तांबेकर, निलेश बोबडे यांनी अनेकदा महापालिकेकडे पत्र व्यवहार करूनही संमस्या ‘जैसे थे’च असल्याने अखेर भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महापालिकेने आता तरी पाणी समस्यांवर लक्ष द्यावे अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.