नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गॅस कंपन्यांनी सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने आता सीएनजी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात गॅसच्या किमती ५०-६० टक्क्यांनी वाढल्या आहे. त्यामुळे आता कारची विक्री आणि बुकिंग १०-१५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. ही परिस्थिती बघता आता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली आहे.
इटीआयजीच्या अहवालानुसार, एप्रिल महिन्यापासून सीएनजी वाहनांच्या विक्रीमध्ये सतत घट होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. याचे मोठे कारण म्हणजे वाढलेले गाड्यांचे दर. पेट्रोल डिझेल वाहनांच्या खरेदीवर सूट मिळाल्याने आणि सीएनजी कार ८० ते ९० हजार रुपयांनी महाग झाल्यामुळे या कारची मागणी कमी झाली आहे.
आकडेवारीनुसार, जुलै २०२२ मध्ये सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा उद्योगाच्या एकूण वाहन विक्रीपैकी १२% होता. देशात विकल्या जाणा-या सीएनजी प्रवासी वाहनांपैकी सुमारे ८५% वाहने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये विकली जातात. त्यामुळे या भागातील शोरूम्सलाही याचा मोठा फटका बसून त्यांचा उद्योग ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे.