कुडूस (वार्ताहर) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विदारक परिस्थिती पहावयास मिळत आहे. खरीवली पौलबारे या जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षक कार्यरत असून त्यांनाच चार वर्गांसाठी अध्यापन करावे लागत आहे. दरम्यान, येथे आणखी एक शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शाळा खरीवली पौलबारे येथे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेसाठी दोन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र अनेक वर्षांपासून फक्त एकच शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांनाच चार वर्गासाठी अध्यापन करावे लागत आहे. एकाच वर्गात एकत्र बसवून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. येथे चार वर्ग खोल्या आहेत. मात्र शिक्षकच नसल्याने एकाच वर्ग खोलीत शिक्षणाचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत. इतर वर्गखोल्यांचा वापर गोदाम म्हणून होत असल्याचे दिसून येते.
शाळेला एकदम छोटेसे पटांगण आहे. त्यामुळे खेळ खेळायला विद्यार्थाना जागा अपुरी पडत आहे. शाळेची स्वतंत्र पाण्याची व्यवस्था नाही. एका उद्योजकाने शाळेला पाणी दिले आहे. शाळेच्या एका वर्गाची दूरवस्था झाली आहे. मात्र शिक्षण प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
खरीवली पौलबारे येथील शाळेत दोन शिक्षकांची पदे मंजूर असून फक्त एकच शिक्षक येथे कार्यरत आहे. -रमेश चव्हाण केंद्रप्रमुख