मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाला आठ दिवस शिल्लक असताना आठवड्याभरात रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे निर्देश पालिकेच्या रस्ते विभागाकडून विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना गणपती आगमनाआधी खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची मागणी गणेश मंडळांकडून होत होती. त्याची दखल घेत पालिकेने आठवडाभरात खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यांची पाहणी करण्यासाठी प्रमुख अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले असून त्यांच्या देखरेखीखाली खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सव सुरू होण्याआधी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता एम. एम. पटेल यांनी दिली. दरम्यान खड्डे तातडीने भरायचे काम सुरू असल्याने त्यासाठी काँक्रीट, कोल्डमिक्स आणि पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या रस्त्यांवर खड्ड्यांचे पॅचेस मोठे आहेत त्या ठिकाणी रॅपिड हार्डनिंग काँक्रीट वापरण्यात येत आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने याच दरम्यान जास्तीतजास्त खड्डे भरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहर आणि पूर्व उपनगरापेक्षा पश्चिम उनगरात जास्तीत जास्त रस्ते आहेत. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता खड्डे भरावे लागणार आहे. रस्ते विभागाने रस्ते अभियंत्यांच्या अंतर्गत पथक तयार केले आहे. या पथकांकडून रस्त्यांची पाहणी सुरू आहे. या दरम्यान खड्ड्यांची माहिती विभाग कार्यालयास कळवली जाते. तर विभाग कार्यालयाकडून ती माहिती संबंधित ठेकेदारास कळवून त्याच्याकडून ते खड्डे भरून घेतले जात आहेत.