Saturday, January 18, 2025

वरकसल

रवींद्र तांबे

वरकसल’ हा शब्द आताच्या पिढीच्या परिचयाचा नसला तरी कोकणातील स्थानिक रहिवासी यांच्या परिचयाचा आहे. उन्हाळा संपून पावसाला सुरू झाला की, शेतकरीदादा कोकणात कोपऱ्यात भात पेरणी करतात. त्याच्या जोडीला सड्यावच्या मळीमध्ये तसेच डोंगराच्या सपाट जागेवर नाचणी, वरी, हरिक, तीळ, कुळीद व भुईमूग अशी पिके घेतात. त्यांना कोकणात ‘वरकसल’ असे म्हणतात. कोकणात मुख्य पिक म्हणजे भात. भात लावून झाल्यानंतर शेतकरी वरकसल अर्थात पिकाच्या कामाला सुरुवात करतात. भात पेरणीच्या वेळी माळरानावरील जमिनीमध्ये नाचणी, वरी व इतर पिकांची पेरणी करतात.

प्रथम शेतकरीदादा आपल्या घराशेजारील, मळ्यातील किंवा खंडाने घेतलेल्या जमिनीत भात लावणी लावून पूर्ण झाल्यानंतर वरकसलकडे आपले लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे भात व वरकसल पिकामुळे कधी त्यांना धान्य दुकानावर जाण्याची वेळ आली नव्हती. कोकणात भात लावणी कोपऱ्यात चिखल करून लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातापायाला मातीतील दगड लागल्यामुळे जखमा झालेल्या असतात. तरीही ज्या ठिकाणी जखम झालेली असते त्याठिकाणी कापडाने बांधून शेतकरी शेतातील कामे करीत असतात. आता जरी मलमपट्टी किंवा औषधे झाली तरी शेतकरी बिभा चुलीत घालून गरम झाल्यावर ज्याठिकाणी जखम झाली असेल त्याठिकाणी बिभ्याचा गरमा गरम चटका देत असत. म्हणजे दुसऱ्या दिवशी हातपाय ठणठणीत. चिखलात काम करायला तयार. असा हा कोकणी शेतकरी अशा अवस्थेत वरकसल शेतीकडे वळतो. त्यांच्या कामाचे कौतुक देश पातळीवर सुद्धा झालेले आहे. आता पर्यंत अनेक संकटे आली त्यावर मात करण्यासाठी लोकांची मोलमजुरी करून पुढे जात राहिले. काही वेळा उपाशीपोटी राहिले मात्र कधी आत्महत्येचा विचार मनात केलेला नाही.

नाचणी व वरीची लावणी करताना भात लावणीप्रमाणे चिखल करण्याची आवश्यकता नसते. सुखीच जमीन नांगरली जाते. जेव्हा पाऊस नसेल किंवा झिरझिरीत पाऊस असेल, तेव्हा नाचणी व वरीची लावणी करतात. वरकसलमधील लावणी करण्यासाठी पूर्ण मळी नांगरून झाल्यानंतर त्यातील रान व बारीक दगड उचलून मळीच्या एका कोनात किंवा बाजूच्या मेरेजवळ ठेवतात. त्यानंतर गुटा फिरवून डेफा बारीक केली जातात. काही वेळा मोठी डेफा डेफळ्याने फोडली जातात. त्यानंतर पाच ते सहा वेळा नांगरणी केली जाते. माती भुसभुशीत अर्थात नाचणीची रोपे लावायला तयार झाली की, तरवा जसा मुळासकट उपटून काढतात. त्याप्रमाणे नाचणी व वरी काढली जाते. त्यानंतर शेतकरी एका टोपलीत राख व त्यात खत मिक्स करून घेतात. नंतर जी जमीन तयार केलेली असेल, त्यावर गुटा फिरवला जातो. सपाट झालेल्या जागेवर शेतकरी आपल्या उंची इतका आयनाच्या झाडाचे हाताच्या मनगटा एवढी जाड काठी घेतली जाते. त्याच्या एका टोकाला कोयत्याने टोक काढले जाते. काठीच्या टोकाकडील भागाने किमान एका फुटाच्या अंतरावर ठोंबयो काढले जातात. त्या ठोंबयामध्ये एक जन राख व खताचे केलेले मिसळन टाकतो. त्यात एक रोपटे लावून माती सारखी करून घेतात. म्हणजे त्या रोपट्याला चारी बाजूने मातीचा आधार दिला जातो.

बऱ्याच वेळा नाचणीची लागवड स्वतंत्र सड्यावर शेतकरी करतात. त्याचप्रमाणे वरीचीसुद्धा लागवड अशा प्रकारे करतात. काही शेतकरी पूर्ण मळीभर नाचणी लावतात. त्याच्या चारी बाजूने तिळाची लागवड केली जाते. काही शेतकरी नाचणी व वरीची लावणी झाली की त्याच्या जोडीला जर जमीन शिल्लक राहिली असेल, तर भुईमूग व कुळीद केला जातो. त्यामुळे आतापर्यंत वर्षभर पुरेल इतके धान्य शेतकरी पिकवित होते. भाताच्या जोडीला अशी विविध पिके करतात. या पिकांमुळे रानातील डुक्कर, ससे, साळींदर, मोर, उंदीर, माकड यांचीपण एक प्रकारे सोय होत असे. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी जंगली जनावरांमुळे वरकसल पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा जरी सहन करावा लागला तरी शेतकरी रानटी जनावरांवर रागावलेला नाहीत. बऱ्याच वेळा पीक तयार झाले की, त्याची राखण शेतकरी रात्रंदिवस करीत असतात. रात्रीचे तर कंदील पेटवून ठेवतात. तरी पण काही वेळा रानटी प्राणी वरकसलची नासधूस करतात.

आता तर शेतकरीदादांचे वरकसलचे वैभव दुरावत चालले आहे. काही ठिकाणी भात जमीन ओसाड पडत चालली आहे. शेतीमध्ये परवडत नाही म्हणून लोक शहराकडे जात आहेत. तेव्हा जनतेच्या अन्नदात्याला भात पिकाबरोबर वरकसलला शासकीय आधार देण्यासाठी शासनाला विशेष मोहीम हाती घ्यावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -