मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी २० संघांची घोषणा करण्यात आली. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरेची भारतीय संघात निवड झाली आहे.
किरण नवगिरेने श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिक्षण घेतले. दरम्यान, विविध क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन यशाचा पाया रचण्यास सुरुवात केली. तिने भालाफेक, बेसबॉल, सॉफ्टबॉल अथेलिटिक्स इत्यादी खेळात पदके जिंकून महाविद्यालय व पुणे विद्यापिठाला अनेक पदके आणि पुरस्कार मिळवून दिले. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. तिने नागालँड आणि अरुणाचल प्रदेश संघाचेही प्रतिनिधित्व केले.
आपल्या खेळात सातत्य ठेवत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाचे दार ठोठावले. अखेर इंग्लंडविरुद्ध आगामी टी-२० मालिकेत तिची भारतीय महिला संघात निवड झाली. अनघा देशपांडेनंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापूरची दुसरी खेळाडू आहे. किरणची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारताचा टी-२० संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, राधा यादव, शबिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, किरण नवगिरे.
इंग्लंड दौऱ्यात भारताचा एकदिवसीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंह, शब्बिनेनी मेघना, तानिया भाटिया (विकेटकिपर), यस्तिका भाटिया (विकेटकिपर), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, हरलीन देओल.