न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : भारतात बालमजुरी, जातीवर आधारित भेदभाव आणि दारिद्र यांचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे विशेष प्रतिनिधी तोमाया ओबोकाता यांनी आपल्या अहवालात नोंदविले आहे. तोमोया ओबोकाता यांनी ‘गुलामगिरीचे समकालिन प्रकार’ या विषयावरील आपला अहवाल संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर केला आहे. या अहवालात त्यांनी नव्या प्रकारच्या गुलामगिरीचे प्रकार, त्यामागील कारणे आणि त्याचे परिणाम यांचा मागोवा घेतला आहे.
दक्षिण आशियामध्ये दलित आणि इतर दुर्लक्षित वर्गातील महिलांना पद्धतशीरपणे अनेक हक्कांपासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जाणे, हा गुलामगिरीचाच एक प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भारताबद्दल निरीक्षण नोंदविताना ओबोकाता यांनी बालमजुरी, जातीच्या आधारावर केला जाणारा भेदभाव आणि गरिबी या समस्या एकमेकांशी थेटपणे जोडलेल्या असल्याचे सांगितले. तळागाळांत रुजलेली भेदभावाच्या सामाजिक रूढी आणि इतर काही घटना या सध्याच्या काळातील गुलामगिरीला कारणीभूत असून अल्पसंख्याकांना त्याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे निरीक्षण ओबोकाता यांनी नोंदविले आहे.
परंपरागत रूढी, जन्माच्या आधारावरील जातीव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि सरकारच्या पातळीवरून केला जाणारा भेदाभेद या कारणांमुळे नव्या प्रकारची गुलामगिरी निर्माण होत आहे, असे अहवालात म्हटले आहे. अल्पसंख्याक आणि निर्वासितांमध्ये बालमजुरीचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. अंगोला, कोस्टारिका, होंडुरास आणि कझाकस्तान या देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे.