आ. नितेश राणे व निलेश राणे यांच्यासोबत मंत्र्यांची भेट घेत केली मागणी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा अनुभव व त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समर्थ साथ लाभल्याने आता हे सरकार डबल इंजिन सरकार झाले आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या सोबत विविध मंत्र्यांची भेट घेत जिल्ह्यातील रखडलेल्या कामांबाबत मागणी केली आहे. त्यातून मागील अडीच वर्षांत रखडलेला जिल्ह्याचा सर्व विकास मार्गी लागणार असून ग्रामीण भागात तळागाळापर्यंत विकास पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील विकासकामांचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडीत आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजू परब, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. यात प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यातील विविध राज्यमार्ग व ग्रामीण रस्ते, दोडामार्ग आडाळी एमआयडीसी, आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न, सावंतवाडी पंचायत समितीची इमारत, नगरपालिकांचे विविध प्रलंबित व अपूर्ण राहिलेले प्रकल्प हे प्रश्न मागील अडीच वर्षात रखडले गेले. दोडामार्ग एमआयडीसी ही तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंजूर केली होती. मात्र सुभाष देसाई उद्योग मंत्री झाल्यानंतर आय एम आय डी सी प्रकल्प रखडला गेला. राणे केंद्रीय उद्योग मंत्री झाल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी राणे यांनी त्यासाठी प्रयत्न केला. मात्र देसाई यांनी त्यांना साथ दिली नाही. आता कोकणचे सुपुत्र उदय सामंत हे उद्योग मंत्री असल्याने या दोघांच्या माध्यमातून आडाळी एमआयडीसीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येईल. यासाठी दोनच दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली असून प्लॉट डिस्ट्रीब्यूशन ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची तसेच गोवा व अन्य भागातील काही उद्योजकांसोबत अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्याची मागणी आम्ही केली असून त्यांनी तसा शब्द दिला असल्याची माहितीही यावेळी राजन तेली यांनी दिली.
गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने महामार्गावरील तसेच राज्य मार्ग व अन्य महत्त्वाच्या मार्गावरील पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत तशी चर्चा केली आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी मंत्री रवींद्र चव्हाण हे यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून हे काम त्वरित मार्गी लागेल, असे अभिवचन त्यांनी दिले आहे.