मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून १४८ गोविंदा जखमी झाले आहेत. दहीहंडी खेळताना मुंबईत १११ गोविंदा जखमी झाले, तर ठाण्यात ३७ गोविंदा जखमी झाले. ८८ गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या. यामुळे यावर्षी कोणत्याही गंभीर जखमी किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही.
जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते. गोविंदांचा १० लाखांचा विमाही काढण्यात आला आहे.
रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे रुग्णाचे हाल
दरम्यान, दादरमधील एक आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी होती. रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले.
दादरमधील आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे गर्दीत एक रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले. दादर पश्चिम येथील आयडियल गल्ली येथील श्री साई दत्त मित्र मंडळाने दहीहंडी आयोजित केली होती. या मित्रमंडळाच्या दहीहंडीत ही घटना घडली आहे. गोविंदा पथकाचे थर लागून उतरेपर्यंत रुग्णवाहिका एकाच जागी उभी होती. मात्र गोविंदा पथकाने आपले थर काही उतरवले नाहीत. त्याचबरोबर आयोजकांनी देखील या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. यामुळे आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.