ठाणे (प्रतिनिधी) : कळवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. एसी लोकल विरुद्ध रेल्वे प्रवाशांनी अचानक आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.
नवीन ट्रॅक होऊनही लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरून मेल गाड्या चालवल्या जात आहेत. प्रचंड गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये चढता येत नसल्याने प्रवाशांनी हे आंदोलन केले आहे. यावेळी कळवा कारशेडमधून सकाळी लोकल पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी काहीवेळ एसी लोकल रोखत आपला विरोध दर्शवला. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली. या वेळी रेल्वे पोलिसांना रेल्वे प्रवाशांच्या संतापला सामोरे जावे लागले. प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले. अखेर प्रवाशांना हटवल्यानंतर एसी लोकलचा मार्ग मोकळा झाला.
हे आंदोलन कारशेडमधून येणाऱ्या ट्रॅकवर करण्यात आले. त्यामुळे एसी लोकल अडविण्यात आल्या, पण या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही, मात्र आंदोलन करणाऱ्या काही महिला प्रवाशांना कळवा स्थानकात थांबवण्यात आले आहे, तर अन्य दोन प्रवाशांना कळवा पोलीस ठाण्यात नेल्याचे बोलले जात आहे. सकाळी कामाला जाताना लोकलमध्ये चढता येत नसल्याने प्रवासी कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढून प्रवास करतात, असे प्रवासी संघटना आणि प्रवासी यांचे म्हणणे आहे. अचानक झालेल्या या उद्रेकामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.