अलिबाग (वार्ताहर) : पिकांची उत्पादकता वाढविणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळणार असल्याने कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी या स्पर्धेसाठी आपापले अर्ज सादर करण्याबाबत कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण ११ पिके आहेत. सर्वसाधारण गटासाठी दहा व आदिवासी गटासाठी पाच, पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या शेतावर त्या पिकाखाली किमान दहा आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करणार आहेत. अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२२ असून, पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ ‘अ’ उतारा व जातप्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम २०२२ साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट २०२२ पूर्वी अर्ज सादर करून भात पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.