कर्जत (वार्ताहर) : कर्जतमधील पोटल येथे राहणारा नवज्योत देशमुखने नुकतीच कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉन या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत सलग ३.८ किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी २००० स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याविरुद्ध १८० किमी सायकलिंग करणे आणि लगोलग ४२.२ किमी धावणे ही अवघड आव्हाने पूर्ण करायची असतात.
भारताचे प्रतिनिधित्व करत असताना हे आव्हान नवज्योत देशमुखने १३ तास ३० मिनिटांत पूर्ण केले. या स्पर्धेसाठी त्यांना पुणे येथील आयर्नमॅन प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ (पॉवरपीकस अॅकॅडमी)चे मार्गदशन मिळाले. ही स्पर्धा जिंकणारा तो कर्जत रायगडमधील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.