Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमहानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून आजीबाई शाळेचा महागौरव!

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून आजीबाई शाळेचा महागौरव!

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाडमधील फांगणे गावातील आजीबाई शाळेचा विशेष सन्मान सुप्रसिद्ध ‘कौन बनेगा करोड पती शो’मध्ये महानायक पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त अमिताभ बच्चन यांनी केला असून आजीबाई शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संपूर्ण देशभरात तसेच विदेशातील १८६ देशात आजीबाई शाळेची कीर्ती पोहोचली असून प्रसार माध्यमांनी आजीबाईंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ८ मार्च २०१६ रोजी आजीबाई शाळेचा शुभारंभ फांगणे गावात झाला. दिवंगत मोतीराम गणपत दलाल ट्रस्टचे शिक्षण क्षेत्रातील समाजसेवक दिलीप भाई दलाल व शिक्षिका शीतलताई मोरे यांच्या योगदानातून शिक्षणक्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व नेहरू युवा केंद्र भारत सरकार जिल्हा युवा गौरव पुरस्कार विजेते योगेंद्र बांगर यांनी या शाळेची मुहूर्त मेढ रोवली. फांगणे गावातील कधीही शाळेत न गेलेल्या निरक्षर अशा आजीबाईंसाठी ही शाळा सुरू झाली.

सुरुवातीला लेखन, वाचन, मुळाक्षरे या माध्यमातून आजीबाई दररोज व शाळेत येऊ लागल्या. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, ही उक्ती सार्थ ठरवत अत्यंत जिद्दीने या सर्व आजीबाईंनी शिक्षणाच्या संधीचे सोने केले. केवळ त्या शिक्षितच झाल्या नाहीत, तर ग्राम सुधारणेसाठीही सदैव कार्यरत राहिल्या. पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, प्रबोधन अशा विविध उपक्रमांत त्यांनी सातत्याने योगदान देऊन फांगणे गावाचे नाव साता समुद्रापार पोहोचवले आहे.

आजीबाई शाळेत क्रीडा महोत्सव, चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, तसेच इतर जीवनो उपयोगी अनेक उपक्रम सातत्याने घेतले जातात. आतापर्यंत या शाळेला अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी अशा २० हून अधिक परदेशी पाहुण्यांनी भेटी दिल्या आहेत. चूल आणि मूल या पलीकडे कधीही न गेलेल्या आजीबाई आता अत्यंत आत्मविश्वासाने आत्मनिर्भरपणे आपले विचार व्यक्त करू लागल्या आहेत. शिक्षण हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे हे स्व मेहनतीने त्यांनी दाखवून दिले आहे. स्वतःच्या कविता देखील त्यांनी करून आपल्यातील सुप्त कलागुणांना प्रगट करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. अनेक प्रकारच्या ओव्या, गीते लोकगीते त्यांना तोंडपाठ असून त्याचे गायन देखील शाळेमध्ये केले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -