Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीआज थर... थराट...

आज थर… थराट…

आज दही हंडी उत्साहात

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यंदा दहीहंडी उत्सवांतूनच फोडला जाणार असेच वातावरण सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि आसपासच्या परिसरात सध्या दिसून येत आहे. गुरुवारच्या जन्माष्टमीनंतर शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव सर्वत्र गल्लोगल्लीत होणार आहे. मात्र दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सर्व प्रमुख राजकीय पक्ष शक्तिप्रदर्शन करणार असेच चित्र दिसत आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने यंदा कोरोनाचे सगळेच निर्बंध उठविल्यामुळे महाराष्ट्रभर व मुंबईत दहीहंडीचा उत्सव आणि गोविंदा पथकांचे थरांवर थर रचलेले पाहायला मिळणार आहेत. मात्र आगामी महापालिका निवडणुका ध्यानी घेऊन यंदा प्रत्येक भागांतील दहीहंडी उत्सवात राजकीय वातावरण पसरलेले दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या बॅनर, पोस्टरसह तसेच मोठाल्या रकमांच्या बक्षिसांसह दहीहंडींचे आयोजन केले गेले आहे. यंदाच्या या राजकीय हंडीच्या वातावरणात भाजपनेच बाजी मारलेली दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला विजय मिळवायचा आहेच, तर दुसरीकडे त्याची तयारीच जणू भाजपने केली आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गोविंदा पथकांच्या सराव शिबिरांचे देखील आयोजन केले गेले होते. दरम्यान वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपकडून मोठी हंडी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी शिवसेनेत गेलेले आणि सध्या विधान परिषदेवर आमदार असलेले सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानकडून दरवर्षी हंडी उभारण्यात येते.

जय्यत तयारी, कलाकारही राहणार उपस्थित

दहीहंडी उत्सवात ज्या प्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखील सुरू करण्यात येते. ज्या सिनेतारकांना टीव्हीवर किंवा मोबाइलवर पाहिलेले असते, त्यांना प्रत्यक्षात बघण्याची नामी संधी दहीहंडी उत्सवात चालून येते आणि अशी संधी सहसा कोणी सोडत नाही. गेली दोन वर्षं कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने गोविंदांना आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील अशी संधी उपलब्ध झाल्या नव्हती. या वर्षी मात्र निर्बंधमुक्त असा दहीकाला उत्सव साजरा करण्यात येतोय. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आयोजक देखील प्रचंड उत्साहात हा उत्सव साजरा करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -