नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरातील विविध गावालगत अनेक प्रकारची बांधकामे चालू आहेत. ही बांधकामे सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य हे चक्क रस्त्याच्या लगत ठेवले जात आहे. त्यामुळे इतर वाहनांना तर फटका बसतोच; परंतु विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा जास्त फटका बसत असल्याने विद्यार्थी उशिरा शाळेत पोहोचत आहेत. यामुळे पालकवर्ग नाराजी व्यक्त करत आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या हद्दीतील गाकुशीच्या आजूबाजूस आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामासाठी लागणारे खडी, वाळू, रेती, लोखंड आदी साहित्य रस्त्याच्या, पदपथाच्या वर नियमबाह्यपद्धतीने ठेवले जात आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या अवजड बसेस, मिनी बसेस यांना त्याचा फटका बसत असल्याचे दृश्य नेहमीच पाहायला मिळत आहे. तर बांधकामाचे साहित्य आणणारे ट्रक, डम्पर, जेसीबी सुद्धा रस्त्याच्या बाजूला उभे असतात. यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसवर परिणाम होत आहे.
बांधकाम साहित्य व रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करणे चुकीचे आहे. त्यामुळे नियमबाह्य बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या घटकांवर कारवाईसाठी सगळ्याच विभाग कार्यालयातील अतिक्रमण प्रशासनाला कळविण्यात येईल. -अमरीश पटनिगिरे, उपायुक्त, पालिका.