Friday, January 17, 2025
Homeमहामुंबईमढ किनाऱ्यावर आढळले जखमी अवस्थेत दुर्मिळ 'लॉगरहेड' जातीचे कासव

मढ किनाऱ्यावर आढळले जखमी अवस्थेत दुर्मिळ ‘लॉगरहेड’ जातीचे कासव

मुंबई (प्रतिनिधी) : मालाडच्या मढ (सिल्वर बीच) किनाऱ्यावर वाहून आलेले दुर्मिळ ‘लॉगरहेड’ जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले असून, सध्या ऐरोलीच्या सागरी जैवविविधता केंद्रांत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सिल्वर बीच समुद्र किनारी फेरफटका मारताना सर्वप्रथम प्रमोद धाडगे यांना भला मोठा समुद्री कासव जखमी अवस्थेत दिसून आला. प्रमोद यांनी क्षणाचा विलंब न लावता प्राणी मित्र आणि वन्यजीव संरक्षक आनंद मोहिते यांना ही माहिती दिली. मोहिते यांनी घटनेची सत्यता पारखून जखमी समुद्री कासवाची माहिती कांदळवन कक्षाचे अधिकारी संतोष जाधव यांना आणि महाराष्ट्र राज्य पोलीस कंट्रोल द्वारे मालवणी पोलीस ठाण्याला दिली.

त्या आधारे पोलीस कर्मचारी योगेश कोळी व निलेश पुकाले, आणि कांदळवन कक्षाचे अधिकारी वनपाल अंधेरी महादेव शिंगाडे वैशाली गवळी व सह अधिकारी अजित परब, राकेश घवली यांनी घटनास्थळी धाव घेत, स्थानिक नागरिक प्रमोद धाडगे, रवी, रमेश, जितू यांच्या मदतीने या कासवाच्या अंगावर ‘बार्नॅकल्स’ प्रजातीचे जे कालवे होते, ते कालवे काढून या जखमी समुद्री कासवास “किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र” येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. सदर लॉगरहेड कासव मादी जातीची असून पाठीवर बोटीच्या पंख्याच्या पातीमुळे जखम झाल्याचे समजते.

गेल्या सहा वर्षात फक्त ८ नोंदी

भारतीय किनारपट्टीवर विशेषतः महाराष्ट्रात या कासवाच्या आतापर्यंत गेल्या सहा वर्षात ८ नोंदी समोर आल्या आहेत. जून २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर, ऑगस्ट २०१७ मध्ये डहाणू आणि केळवा येथे मादी लॉगरहेड कासवाची नोंद करण्यात आली. सन २०२१मध्ये मालवण बंदर जेट्टी आणि वायरी किनाऱ्यावर दोन लॉगरहेड कासवाची पिल्ले सापडली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात १२ आणि १३ ऑगस्टला दिवेआगर किनाऱ्यावर २ कासवे आढळून आली. त्यातील एका कासवाचे तीनच ‘फ्लिपर शाबूत होते. उरण तालुक्यातील कारंजा खाडीत १६ ऑगस्ट रोजी एक ‘लॉगरहेड’ समुद्री कासव मच्छीमारांना आढळून आले. आणि १७ ऑगस्ट रोजी मादी ‘लॉगरहेड’ समुद्री कासव मढ किनाऱ्यावर वाहून आले होते.

“कांदळवन कक्षाच्या सागरी प्राणी रेस्क्यू आणि रिलीज समितीने दिलेल्या सूचनांनुसार या दुर्मिळ कासवावर शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार केले जातील. त्यानंतरच समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या कासवाची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात येईल. कासवाच्या पाठीवरील शेवाळ आणि बारनॅकल्सच्या आधारे या कासवाचा भ्रमणमार्ग ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाईल. अजून तरी या मादी कासवाचे ‘सॅटलाईट टॅगिंग करण्याचा विचार आमचा नाही.” अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -