अधिवेशनातही उमटले पडसाद; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली बोटीची इत्यंभूत माहिती
मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बोटीत एके-४७ रायफल्स आणि काडतुसे सापडली. रायगडचा समुद्रकिनारा याआधीपासूनच संवेदनशील राहिला आहे. त्यामुळे हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडलेल्या या बोटीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्याचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी त्यांनी कोकणातील समुद्रात सापडलेल्या या बोटीची इत्यंभूत माहिती सभागृहाला दिली.
या बोटीचे नाव लेरिहान असून ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची होती. महिलेचे पती जेम्स हार्बर्ट या बोटीचे कप्तान होते. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेने जात होती. मात्र, २६ जून रोजी सकाळी १० वाजता ही बोट समुद्रात भरकटली होती. त्यानंतर बोटीवरील खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यावेळी एका कोरियन युद्धनौकेने या बोटीवरील खलाशांची सुटका केली व त्यांना ओमानच्या स्वाधीन केले होते. परंतु, तेव्हा समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नव्हते. त्यानंतर समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली, अशी माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
सध्या राज्यात सणासुदीचे वातावरण असल्याने ही बोट सापडल्यानंतर पोलीस आणि अन्य घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या सगळ्याचा तपास करत आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षेत कुठलीही कमतरता राहू नये, यादृष्टीने शहरांमध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सणांचे दिवस असल्याने कुठलीही विपरीत घटना घडणार नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही सातत्याने केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.