
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत वापरत असलेल्या २ महागड्या गाड्या या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आता ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात मुलुंड, भांडूप, आणि विक्रोळी परिसरात छापे टाकले. यावेळी मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले असून त्यात हे प्रकरण उघडकीस आले आहे.
श्रद्धा डेव्हलपर्स आणि संजय राऊत यांच्यात आर्थिक लागेबांधे असल्याचे सिद्ध झाल्यास ईडी आणखी खोलवर जाऊन चौकशी करु शकते. यासाठी ईडीकडून संजय राऊत यांची कोठडी आणखी काही काळासाठी वाढवून मागितली जाऊ शकते. ही बाब संजय राऊत यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. अनेक प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांसाठी श्रद्धा डेव्हलपर्सचा आर्थिक स्त्रोत काय, याचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे.
संजय राऊत यांच्याकडे असलेल्या महागड्या कारची खरेदी श्रद्धा डेव्हलपर्सकडून करण्यात आली असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर ईडीने छापा मारला. श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केलेल्या कार आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी ईडीकडून सुरू करण्यात आली आहे. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यातील रक्कमेची विल्हेवाट करण्यासाठी श्रद्धा डेव्हलपर्सने संजय राऊत यांना मदत केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांच्या संयुक्त मालकीच्या अवनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाचीही ईडीने झडती घेतली आहे.
ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे केवळ नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असे ईडीने न्यायालयात सांगितले आहे.