Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीवरळीत शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय!

वरळीत शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय!

मुंबई : वरळी हा शिवसेनेचा मुंबईतील एक बालेकिल्ला मानला जातो. मात्र एक खासदार, तीन आमदार, माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक अशी मातब्बर मंडळी असतानाही आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मात्र शिवसेनेला सपशेल अपयश आले आहे.

एकीकडे भाजपने दहीहंडी उत्सवासाठी जांबोरी मैदान पटकावल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असताना शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यातही वरळी फार मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे.

वरळी परिसरातून नोटरी करण्यासाठी कमी संख्येने निष्ठावंत मंडळी शिवसेना भवनात पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात स्टॅम्प पेपरसाठी कोणी खर्च करायचा असा कळीचा मुद्दा वरळीमध्ये उपस्थित झाला आहे. यासाठी कोणताही मोठा नेता पुढे येत नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची मातोश्रीने गंभीर दखल घेतली असून या परिसरातील नेते मंडळींना कानपिचक्या मिळू लागल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे गावोगाव फिरत निष्ठा यात्रा काढत आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्ह टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूपच मेहनत घ्यावी लागत आहे.

तळागाळातील शिवसैनिकांची आपल्यालाच साथ आहे, ते सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली जात आहेत. शिवसेनेतील खासदार, आमदार, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी शपथपत्र सादर करण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यानुसार शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये, शाखांमधून शपथपत्रे तयार करून मुंबईत पाठविण्यात येत आहेत. मात्र, शिवसेनेची तगडी ताकद मानल्या जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातच सर्वांत कमी शपथपत्रे आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनेने शपथपत्राचा मसुदा तयार केला असून तो नमूद केलेला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची नोटरी करावा लागत आहे. प्रत्येक निष्ठावंताला स्टॅम्प पेपरसाठी १०० रुपये आणि नोटरीसाठी ५० रुपये खर्च येत आहे. नोटरीसाठी पैसे खर्च होऊ नये यासाठी शिवसेना भवनामध्ये १२ व्यक्तींवर शपथपत्रांची नोटरी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबईतील विविध विभागांमधून शपथपत्र सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत मुंबईमधील वरळी आणि दादर वगळता अन्य विभागांतून प्रत्येकी सरासरी सात हजारांच्या आसपास शपथपत्रे सादर करण्यात आली आहेत. दादर भागातून सुमारे पाच हजारांच्या आसपास शपथपत्रे सादर झाली आहेत. मात्र शपथपत्र सादर करण्यात दस्तुरखुद्द आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ पिछाडीवर आहे.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीत वरळी परिसरातील सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची वर्णी लागली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषविले आहे. याच परिसरातून माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि बेस्ट समितीचे अध्यक्षपद चार वेळा भूषविणारे आशीष चेंबूरकर विजयी झाले होते. तरीही वरळी परिसरातून मंगळवारपर्यंत केवळ तीन हजार २०० शपथपत्रे सादर झाल्याने वरळीत शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय, अशी चर्चा होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -