Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात पुन्हा घातपात?

महाराष्ट्रात पुन्हा घातपात?

श्रीवर्धन समुद्र किनारी दोन बोट आणि शस्त्रसाठा सापडला

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल आणि काडतूस आढळल्या आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यांपैकी एका बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे पण हे लोक नेमके कोण आहेत हे समजू शकलेले नाही, अनिकेत तटकरे यांनी ही माहिती दिली.

खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही लाईफ जॅकेट्सही या परिसरात सापडले आहेत. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, या घटनेचा तातडीनं सर्व यंत्रणांच्या मार्फत तपास व्हायला हवा. त्याचबरोबर अशाच पद्धतीची घातक शस्त्रे आपल्या किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी केल्या होत्या, काही यंत्रणा उभी केली होती. त्यांचं यामध्ये अपयश आहे का? याची चौकशी करण्यात यावी. कारण या बोटी भरकटून किनारपट्टीवर आली की काय हे देखील तपासातून पुढे येईल.

रायगडच्या जनतेने विचलीत होऊ नये, अशी विनंती त्यांना करतो. चोवीस तासात याबाबतीतले सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकाने या घटनेची सूत्र तातडीने हातात घेणे गरजेचे आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सुरक्षेच्या यंत्रणांनी हा तपास करणे गरजेचे आहे, असेही पुढे सुनील तटकरे म्हणाले.

काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

याआधी मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -