संतोष वायंगणकर
महाराष्ट्राचा विचार करताना शासकीय योजनांचे लाभ आणि सरकारचा सर्वांधिक निधी पश्चिम महाराष्ट्रातच खर्च झालेला दिसेल. सत्ताकेंद्रही पश्चिम महाराष्ट्रातच राहिले आहे. राजकारण करतानाही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी नेहमीच विकासाचे, सहकाराचे आणि सकारात्मकतेचे राजकारण केले. दूध आणि साखर यातून समृद्धी घरोघरी पोहोचली. अर्थात परस्परांत सहकार्याची भावनाही अधिक महत्त्वाची आहे. केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका कधी राहिली नाही. जे आपल्या भागाच्या हिताचे आणि विकासाचे आहे, त्यात सर्वजण एकजुटीने उभे राहतात. म्हणूनच कृषी क्षेत्रात प्रगती करू शकले. त्यातून कौटुंबिक प्रगती साधू शकले. पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्रच वातावरण अनुकूल आहे असं नाही; परंतु संकट आणि प्रतिकुल परिस्थितीवर पाय ठेऊन उभं राहण्याची मानसिकता असते. दुष्काळी भागात जी पिके घेतात ती पाहून डोळ्यांत पाणी येईल अशी स्थिती असते. पाच-सात किलोमीटरमध्ये पाण्याचा टिपूसही नसतो. पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू असते. मात्र, तरीही दुष्काळावर मात करत तिथला शेतकरी उभा राहतो. सांगली जिल्ह्यातील सावर्डे ता. तासगाव या गावात एका प्राचार्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कृषी क्षेत्रात मागील पाच वर्षांत क्रांती केली. प्रा. राजा माने असं या शेती तज्ज्ञाचे नाव आहे. गावच बदलून टाकले. शेती क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रा. राजा माने यांनी केले. उसाच्या शेतीने पाण्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून केसर आंबा, ड्रॅगन यांसारख्या फळांचे उत्पादन घेऊन जगाच्या बाजारपेठेतही इथली फळं जात आहेत. कणकवली कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करणाऱ्या प्रा. राजा माने यांनी प्राचार्यपद सोडून सावर्डे गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी क्षेत्रात बदल घडवला. ‘मास्तराने गाव बदलला’ असं त्या भागात म्हटले जाते. कोणत्याही क्षेत्रातील प्रगती, क्रांती ही अपार मेहनत आणि कष्टाशिवाय होत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील मानसिकता ही व्यावसायिक आहे. व्यवसाय कसा करावा, ग्राहक कसा जोडावा, सेवा कशी द्यावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या रोजच्या अनुभवातूनही आपणाला दिसून येणार आहे. साध्या उदाहरणातूनही बरंच काही शिकण्यासारखे आहे.
कोल्हापूरला काही खरेदीला आपण गेलो, तर तिथला व्यावसायिक ज्या पद्धतीने ग्राहकाला वागवतो ते अनुभवून आपणालाही खरेदी करावंस वाटतं. हॉटेलमध्ये गेल्यावर ज्या आपलेपणाने विचारणे आणि काय देऊ, कट देऊ का? रस्सा घ्या असं विचारण्यात संयम आपल्यामध्ये नसतो. ग्राहक आल्यावरच ‘ह्यो काय घेवचो नाय’ अशी ग्राहकाची पुडी बांधून आपण मोकळे होतो. खरं तर अशी अटकळ बांधून ग्राहकाशी वागण्याची आवश्यकता नसते. कदाचित एखादा ग्राहक काही खरेदी न करता जात असला तरीही हा दुकानदार त्याच्याकडून काही खरेदी न करताही फार चांगला वागला या समाधानात तरी तो जाईल. दुसऱ्या वेळी खरेदीसाठी नक्कीच तो पुन्हा येईल; परंतु जर दुकानदार म्हणून आपण चांगले वागलो तरच हा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्रात एखाद्या व्यावसायिकाकडे एक वस्तू खरेदीबद्दल विचारलं तर आणखी दहा वस्तू दाखवतील आणि सांगण्यात जो गोडवा, आपलेपणा असतो तो कुणालाही भावणारा असतो. गाडी दुरुस्ती असो किंवा आणखी काहीही असोत; परंतु त्याची पूर्ण माहिती देणे, त्यातून होणारे फायदे आणि तोटे दोन्ही सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘हवं तर घ्या नाही तर जा’ ही भाषा आणि वागणूक कुठेही अनुभवायला मिळणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार आपण कोकणवासीयांनी केला पाहिजे. व्यावसायिकता कशा पद्धतीने असायला हवी हे समजून घेतली पाहिजे.
आपल्याकडे काही सन्माननीय अपवाद वगळता हॉटेल आदी व्यवसायिकांकडे गेल्यावर ग्राहकाशी बोलायलाही वेळ देण्याइतका त्या वस्तू घेण्यासाठी ते तुमची मानसिकता करतील आणि आपणही त्यांच्या बोलण्याने सहज घेऊनही मोकळे होतो. कोणत्याही स्थितीत ग्राहक आपल्यापासून दुरावला जाऊ नये याची पुरेपूर काळजी ते घेतात. हा अनुभव आपणाला सर्वच व्यवसायांच्या बाबतीत येईल. ते ग्राहक कोणत्याही स्थितीत सोडणार नाहीत. ते विश्वास ठेवतात आणि विश्वास टाकतातही. व्यवसायात आवश्यक असणारा कमालीचा संयमीतपणा, चिकाटी याच दर्शन जागोजागी आपणाला घडेल. आपणाला त्याला कसा धडा शिकवला, त्याला माफी मागायला लावली याच आनंदात आपण असतो. यामुळे आपल्या व्यावसायिक प्रगती भोवती आपणच परिघ तयार करतो. त्यातून अहं जपत आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नाही आणि जे असा प्रयत्न करतात ते निश्चितपणे प्रगतीच्या नवनवीन दालनात प्रवेश करतात. कोकणातील सारा किराणा व्यापार पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेशी निगडित आहे. आजही तो तसाच सुरू आहे. आता मुंबई, बेळगाव या बाजारपेठेतूनही कोकणात वस्तू येत असल्या तरीही व्यापाराचे पश्चिम महाराष्ट्राशी असलेले व्यापारी नाते तसेच आहे. आपणाला पश्चिम महाराष्ट्रातून खूप काही शिकता येण्यासारखे आहे. शिकलं पाहिजे, प्रगती ही संयमातूनच होत असते.