काबूल : अफगानिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सायंकाळी एका मस्जिदीत भीषण बॉम्बस्फोट झाला. त्यात २० जण ठार, तर ४० जण जखमी झाले. टोलो टीव्हीच्या टेलिग्राम चॅनलच्या माहितीनुसार, काबूलच्या खैरखाना भागातील अबूबकीर सेदिक मस्जिदीत मगरीबच्या नमाजावेळी धमाका झाला.
तालिबानच्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, काबूलच्या पीटी-१७ भागात झालेल्या या स्फोटात मस्जिदीचे मौलवी आमीर मोहम्मद काबुली यांचाही मृत्यू झाला आहे. रुग्णालयात २७ जणांना दाखल करण्यात आले आहे. यात ५ मुलांचाही समावेश आहे. यातील एक मूल अवघ्या ७ वर्षांचे आहे.
गत आठवड्यात काबूलमध्ये झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात तालिबान समर्थक मौलाना शेख रहीमुल्ला हक्कान यांचा मृत्यू झाला होता. त्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या कुख्यात अतिरेकी संघटनेने घेतली होती.
तत्पूर्वी, ८ ऑगस्ट रोजी काबूलच्या एका बाजारात झालेल्या स्फोटातही ८ जणांचा बळी गेला होता. तर २२ जण जखमी झाले होते. हा स्फोट शहराच्या पश्चिम भागात झाला. या भागात शिया मुस्लिमांची नेहमीच वर्दळ असते. या स्फोटाची जबाबदारीही इस्लामिक स्टेटने घेतली होती.