Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईत १२०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ९५ टक्के लक्षणविरहित

मुंबईत १२०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ९५ टक्के लक्षणविरहित

मुंबई (प्रतिनिधी) : सण सुरू झाले असतानाच मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाली आहे. लक्षणविरहित रुग्णांची संख्या वाढत असून गुरुवारी हजारच्यावर कोरोना रुग्णसंख्या पोहचल्यामुळे मुंबईकरांसोबतच पालिकेची चिंता वाढली आहे.

गुरुवारी दिवसभरात मुंबईत १२०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आज उपचाराने बरे झालेल्यांची संख्या ६८१ आहे. दिवसभरात २ जणांचा कोविड आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान गेले काही दिवस कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता वाढताना पाहायला मिळत आहे. तर ९५ टक्के रुग्ण हे लक्षणविरहित आहेत.

सध्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्याही चिंतेत भर पडली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर कमी होत असून ९७.८ टक्के झाला आहे तर कोविड वाढीचा दर ०.०७२ टक्के झाला आहे. कोविड दुप्पटीचे दिवस ९४९ दिवस झाले आहेत.

सध्या सणांचे दिवस सुरू झाले आहेत. या सणांमध्ये मुंबईत अनेक भागांमध्ये गर्दी होत असते. बाजारातही खरेदीसाठी लोकांची गर्दी होते. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment