सुकृत खांडेकर
भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन देशात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक शहरात, गावागावांत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. देशभक्ती आणि देशप्रेम भारतवासीयांच्या रोमारोमांत कसे भिनले आहे व देशासाठी कसे उचंबळून येते याची प्रचिती त्या दिवशी आली. यंदाचा १५ ऑगस्ट हा नेहमीपेक्षा वेगळा होता. दरवर्षी लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान तिरंगा फडकवतात आणि देशात सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घर घर तिरंगा, हर मन तिरंगा अशी घोषणा दिली आणि साऱ्या देशात वातावरण बदलले. जनतेत चेतना फुलली. मुंबई-दिल्लीतील चाळीस-पन्नास मजली टॉवर्सपासून ते झोपडपट्यांपर्यंत, प्रत्येक शहरातील हौसिंग सोसायट्यांपासून चाळी आणि जुन्या वाड्यांपर्यंत, मैदाने बगिचे, शाळा-कॉलेजेस-विद्यापीठे, सरकारी-निमसरकारी-खासगी कार्यालये व आस्थापना अगदी पानटपरीच्या दुकानांपासून ते डिपार्टमेंटल स्टोअर्स व मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र तिरंगा डौलाने फडकताना दिसला. रिक्षा-टॅक्सी- खासगी वाहनांवर, बसेसवर तिरंगा झळकताना दिसला. विशेष म्हणजे काश्मीरमध्येही यंदा प्रथमच सारे जहाँ से अच्छा, अशी धून वाजवत स्वातंत्र्यदिनाच्या मिरवणुका रस्त्यावर बघायला मिळाल्या. मुंबईसह इतर शहरात मुस्लीम वस्तीत तिरंगा मिरवणुका निघाल्या.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपला सहभाग असला पाहिजे, अशी भावना प्रत्येकाच्या हृदयात निर्माण झाली. जात-पात, भाषा, धर्म, पंथ, यांच्या भिंती ओलांडून भारतीय जनतेने दाखवलेल्या एकजुटीचे व राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन सर्व जगाला दिसून आले. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जगात अनेक देशांनी साजरा केला व भारताविषयी आदर-प्रेम असल्याची भावना दाखवून दिली. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरले. युरोप-अमेरिका, आखाती देशात अनेकदा दौरे केले. शेजारी राष्ट्रांशीही चांगले संबंध प्रस्थापित केले. दुबईतील बुर्जखलिफा, कॅनडातील नायगरा फॉल्स, अमेरिकेतील द एम्पायर स्टेट्स, स्वीर्झलंडमधील मॅनहॅटन मॉन्टन्स, न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर, पॅरिसमधील आयाफेल टॉवर्स, मलेशिया, इटली, ब्रिटन आदी देशात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा झाला.
कुवेतमध्ये भारताचा तिरंगा रंगवलेल्या शंभर प्रवासी बसेस धावत होत्या. १९४७ साली भारताची फाळणी झाली व पाकिस्तानची निर्मिती झाली. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. यंदा पाकिस्तानाचाही अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन झाला. पण जगात कुठे त्याची दखल घेतली असे दिसले नाही. भारताचा स्वातंत्र्य दिन हा आपल्या मित्रराष्ट्राचा स्वातंत्र्य दिन आहे या भावनेने जगभर साजरा केला गेला. भारताविषयी मैत्रीची भावना जगात निर्माण करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीलाच दिले पाहिजे. विद्युत रोषणाईच्या रूपात भारताचा तिरंगा तेथे झळकताना दिसला. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट, ही मध्य व पश्चिम रेल्वेची मुख्यालये, मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, मुंबई महापालिका अशा ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा विद्युत रोषणाईच्या रूपात झळकत होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेले भाषण खूपच मौल्यवान होते. ते नेहमी जे बोलतात ते मनापासून बोलतात. सर्वसामान्य जनतेच्या हृदयाला भिडणारे बोलतात. देशाचा विकास आणि देशाची सुरक्षा हा त्यांचा दृढनिश्चय आहे. विकासाची फळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत ही त्यांची मनोकामना आहे. म्हणूनच सर्वस्व पणाला लावून ते देशाचे सर्वोच्च नेते म्हणून रोज अठरा अठरा तास काम करीत असतात. देशाला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ते साकार करताना भ्रष्टाचार, घराणेशाही आणि भाऊबंदकी यांची देशाला लागलेली किड दूर केली पाहिजे, असे त्यांनी परखडपणे यंदा लाल किल्ल्यावरून बोलताना सांगितले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाला सर्वाधिक भाषणे दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात त्यांची नोंद आहे. पं. नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून १७ वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून १६ वेळा १५ ऑगस्टला भाषण केले. सन २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारचे नेतृत्व डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. या काळात दहा वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण केले. सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यानंतर ते दर वर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आले आहेत व यंदा त्यांनी सलग ९ व्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केले. लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे मोदी हे बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. मोदींच्या अगोदर भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९८ ते २००३ या काळात पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर सहा वेळा तिरंगा फडकवला होता.
१९४७ मध्ये पं. नेहरू यांनी १५ ऑगस्टला देशवासीयांना उद्देशून केलेले भाषण ७२ मिनिटांचे होते. सन २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण सर्वात मोठे म्हणजे ९४ मिनिटांचे होते. २०१५ मध्ये मोदींचे भाषण ८६ मिनिटांचे होते, तर २०१७ मध्ये त्यांनी केवळ ५६ मिनिटे भाषण केले होते. पंतप्रधान झाल्यावर २०१४ मध्ये मोदींनी केलेले भाषण ६५ मिनिटे, २०१८ मध्ये ८३ मिनिटे, २०१९ मध्ये ९२ मिनिटे, २०२० मध्ये ९० मिनिटे व २०२१ मध्ये ८८ मिनिटे त्यांनी भाषण केले होते. यंदा २०२२ मधील त्यांनी ८३ मिनिटे भाषण केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००५ व २००६ अशी दोनच वर्षे ५० मिनिटांपेक्षा अधिक भाषण दिले. स्वातंत्र्यदिनाला झालेली त्यांची अन्य भाषणे ही ३२ ते ४५ मिनिटांची होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेली भाषणे ३० ते ३५ मिनिटांची होती. २००२ मध्ये त्यांनी केलेले भाषण २५ मिनिटांचे होते, तर २००३ मधील भाषण ३० मिनिटांचे होते.
पंतप्रधान मोदींनी देशातील वाढलेल्या भ्रष्टाचाराविषयी व्यक्त केलेली चिंता आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याचा केलेला निर्धार स्वागतार्ह आहे. सामान्य माणसाला भ्रष्टाचाराला रोज सामोरे जावे लागते. विकास योजनांच्या नावावर जो प्रचंड भ्रष्टाचार होतो, त्याला लगाम घालणे हे फार मोठे आव्हान आहे. रस्ते, पूल, इमारती व प्रकल्पांच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार होतो. रेशन कार्ड, आरटीओ, एसआरए, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, गृहनिर्माण ही खाती तर भ्रष्टाचाराची कुरणे आहेत. दलाल आणि कंत्राटदारांनी त्यांना पूर्ण घेरले आहे. मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयापर्यंत कुठेही सहज काम होत नाही, ही वर्षानुवर्षे साखळी आहे, ती तोडणार कशी? भरभक्कम पगार असूनही, मुबलक सुट्ट्या असूनही, शासकीय सेवेचे सर्व लाभ असूनही साध्या कामासाठी जनतेला हेलपाटे का मारावे लागतात? अगदी मॅरेज सर्टिफिकेट घेण्यासाठीही पाकिटे का सरकावावी लागतात? हे चित्र बदलायचे असेल, तर राजकारणाबरोबरच शासकीय कामकाजातील दैनंदिन भ्रष्टाचाराला लगाम घालावाच लागेल….