मुंबई (वार्ताहर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवांसाठी प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) आणि विशिष्ट सेवांसाठी पोलीस पदकाने (पीएम) सन्मानित करण्यात आले. महानिरीक्षक सह प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे प्रवीण चंद्र सिन्हा यांना विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) प्रदान करण्यात आले. तर इतर दोन आरपीएफ कर्मचाऱ्यांना भारतीय पोलीस पदक (पीएम) प्रदान करण्यात आले. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रभारी) प्रकाश बुटानी यांनी आपल्या भाषणात पदक विजेत्यांचे कौतुक केले.
रेल्वे संरक्षण दलाचे दोन कर्मचारी निरीक्षक राजीव सिंग सलारिया आणि पश्चिम रेल्वेचे हेड कॉन्स्टेबल कंवरपाल यादव यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल भारतीय पोलीस पदक प्रदान करण्यात आले. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक सह प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पी सी सिन्हा यांनी युएनएमआयके, कोसोवो आणि उत्तर पूर्वच्या दुर्गम भागात, बिहार, आंध्र प्रदेश या नक्षलग्रस्त भागात, तामिळनाडू, झांसी येथे सेवा प्रदान केली आहे. तसेच कोरोना काळात मुंबईत त्यांनी प्रभावी कामगिरी केली.
निरीक्षक आरपीएफ राजीव सिंह सलारिया यांनी आईपीएफ बोरीवलीच्या रुपात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अवैध दलालीसह विविध प्रकरणे समोर आणली आहेत. आरपीएफ हेड काँस्टेबल कंवरपाल यादव यांना ३० वर्षांच्या उत्कृष्ट कामाबाबत पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.