सोनू शिंदे
उल्हासनगर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून परिमंडळ ४ क्षेत्रातील ६२ गुन्ह्यांतील तब्बल ३१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या हस्ते परत करण्यात आला. यामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या साउंड ऑफ म्युझिक या मोबाईल दुकानातील सुमारे १८ लाख रुपयांच्या महागड्या मोबाईलचा समावेश होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या गौरवशाली पर्वानिमित्त पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी टाऊन हॉल येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम सायंकाळी आयोजित केला होता.
सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ विभागातील बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांच्या पोलीस पथकाने दोन गुन्ह्यामधील दहा हजार रुपये, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या पोलीस पथकाने दोन गुन्हयामधील ३५ हजार रुपये, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांच्या पोलीस पथकाने सहा गुन्ह्यांमधील दोन लाख ४५ हजार रुपये, हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या पोलीस पथकाने सहा गुन्ह्यांमधील ४४ हजार रुपये आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या पोलीस पथकाने दोन गुन्ह्यांमधील ५५ हजार रुपये असे एकूण १८ गुन्ह्यांमधील ३ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर विभागातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पोलीस पथकाने २० गुन्ह्यांमधील ४ लाख १५ हजार रुपये, मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पोलीस पथकाने ८ गुन्हयांमधील १९ लाख ४३ हजार रुपये व उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पोलीस पथकाने १६ गुन्ह्यांमधील ४ लाख २१ हजार रुपये असे एकूण ४४ गुन्ह्यांमधील २७ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला.