शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा अपघात की घात यावरून मेटे समर्थकांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघात घडल्यानंतर त्यांना वेळेवर उपचार मिळाले असते, तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. घरच्यांनाही अपघाताची माहिती उशिरा समजली, असे मेटे यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीमुळे या अपघाताची आता सखोल चौकशी केली जात आहे. अपघाताची घटना किती वाजता घडली, उपचाराला वेळ का लागला आणि त्यांना मदत का मिळाली नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून पुढे येतील. त्यामुळे अपघात की घातपात हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र या रस्त्यावरचा हा काही पहिलाच अपघात नाही, तर या पूर्वी अनेक अपघात होऊनही परिस्थिती का सुधारत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
गेल्या दीड वर्षांत तीनशे अपघातांमध्ये १२५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २११ जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत एक्स्प्रेस वेवर भरधाव वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मुंबई पुणे-एक्स्प्रेस वे हा देशातला पहिला एक्स्प्रेस हायवे म्हणून ओळखला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील एक मानला जातो. हा महामार्ग बांधण्याच्या योजनेचे काम १९९७ साली शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात हाती घेण्यात आले. पाच वर्षांनी म्हणजे एप्रिल २००२ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या एक्स्प्रेस हायवेचे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे नामकरण करण्यात आले. सुमारे ९४.५ किलोमीटर लांबीचा सहा लेनचा हा रस्ता मुंबई आणि पुण्याला जोडला जात असला तरी मुंबई परिसरातून सातारा-कोल्हापूर-बंगलोर आणि अगदी कोकणात जाणारे अनेकजण याच महामार्गावरून प्रवास करतात. जुलै २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार या महामार्गावरून दररोज एक लाख तीस हजार वाहने प्रवास करतात. या महामार्गावर झालेल्या अपघातात अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले होते. २३ डिसेंबर २०१२ रोजी अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा अपघातात मृत्यू झाला. अलीकडच्या काळातही अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी तसेच काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांच्या अपघातांमुळे हा रस्ता चर्चेत आला होता.
जेपी रिसर्च या संस्थेने २०१८ साली मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर झालेल्या ११० मोठ्या अपघातांवर संशोधन केले होते. त्यानुसार अपघाताची काही मुख्य कारणे काय आहेत यावर प्रकाशझोत टाकला. भरधाव वेगात वाहन चालविणे (ओव्हरस्पीडिंग), अचानक मार्गिका बदलणे (लेन कटिंग), सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे, ड्रायव्हरला आलेला थकवा, इमर्जन्सी किंवा ब्रेकडाऊनमुळे रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे. रात्रीच्या प्रवासात ५४ टक्के अपघात घडतात. ट्रकसारख्या अवजड वाहनांच्या चालकांकडून होणारे उल्लंघन आणि वाहने ओव्हरलोड असण्यामुळेही अनेकदा अपघात घडत असल्याची तक्रार वारंवार केली जाते. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, अपघातानंतर उपलब्ध उपचारांचा. कुठल्याही दुर्घटनेनंतर पहिल्या तासाभरात मिळणारे उपचार एखाद्याचे प्राण वाचवू शकतात. हे जरी खरे असले तरी, महामार्गावर योग्य ठिकाणांवर ट्रॉमा सेंटरची आवश्यकता आहे, याकडे लक्ष द्यायला हवे.
एक्स्प्रेस वेवर ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे. वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी वाहने ही १०० किमीपेक्षा अधिक गतीने धावत असतात. त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण ती परिणामकारक नसल्याचे दिसून येते. ट्रक व इतर मोठ्या वाहनांकडून ‘लेन’ची शिस्त पाळली जात नसल्यामुळे अपघात होतात. त्याबरोबरच बंद पडलेल्या ट्रकच्या बॅकलाइट चालकांकडून लावल्या जात नाहीत. त्यामुळे अंधारातील वाहने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वेळीच दिसत नाहीत आणि अपघात होतात. अशी अनेक कारणे असली तरी सुद्धा तातडीच्या वैद्यकीय सुविधांची कमी आहे आणि असलेल्या सुविधांची अनेक प्रवाशांना माहिती नसते, ही बाब आता मेटे यांच्या अपघातानंतरही प्रकर्षाने दिसून आली आहे. तळेगाव या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. २०१९ साली तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन केले होते. पण हे सेंटर पुरेसे आणि कार्यक्षम आहे का? असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. कॅगने २०१८-१९ सालच्या अहवालात सेंटरचे स्थान आणि खासगी जागेवर त्याच्या उभारणीविषयी एमएसआरडीसीवर ताशेरे ओढले आहेत. या महामार्गावरचा लोणावळा ते खालापूर हा रस्ता घाटातून जातो आणि हाच या मार्गावरचा सर्वात धोक्याचा भाग आहे. घाटातून वेगाने गाड्या खाली येताना अपघातांची शक्यताही वाढते. पण लोणावळ्यावरून गाडी खाली उतरली की, पनवेलपर्यंत एकही मोठे हॉस्पिटल नाही, ही बाब प्रकर्षाने जाणवते. “गोल्डन अवरमध्ये एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. एवढा टोल जमा होतो आहे, फूड मॉल्स उभे राहत आहेत. आता सरकारला मॉल की ट्रॉमा सेंटर यांपैकी प्राथमिकता कशाला द्यायची हे ठरवायला हवे. त्याचसोबत अद्ययावत अॅम्ब्युलन्सची गरज भासत असल्याचे रस्तेविषयक अभ्यासकांचे म्हणणे आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना टोल देताना वाहन मालकांच्या खिशाला चाट पडते. त्यामानाने जीवघेण्या प्रवासातून वाचण्यासाठी वैदयकीय सोयीसुविधांची यंत्रणा का सक्षम नाही हे याकडे आता लक्ष दयावे लागेल.