मीनाक्षी जगदाळे
मागील लेखात आपण अविवाहित महिलांना येणाऱ्या विविध समस्या आणि त्यातून त्यांची बिघडत जाणारी मानसिकता यावर ऊहापोह केला. आपल्या आयुष्यात कधी काय आणि कसे घडणार आहे हे कोणालाच माहिती नसते. त्यामुळे स्वखुशीने असो वा दुर्दैवाने असो ज्या महिला अविवाहित राहिल्या आहेत त्यांना या लेखामार्फत आपण काही मार्गदर्शन करणार आहोत. घडून गेलेल्या घटनांना जबाबदार कोणीही असो पण त्याचा आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर किती परिणाम करून घ्यायचा, झाले गेले सोडून देऊन रोज नव्याने आयुष्य कसे जगायचे हे फक्त आपल्याच हातात आहे. आपल्याला जर कुटुंबाकडून, समाजाकडून केवळ आपण विवाहित नसल्याने प्रेम, आपुलकी आणि आदर मिळत नसेल, तर स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका. आपल्यावर अन्याय, अत्याचार झाला होता, होत आहे ही भावना प्रथम मनातून पूर्णतः काढून टाका.
आपण एकट्या आहोत त्यामुळे आपल्याला कुटुंबाची, नातेवाइकांची, मित्र- मैत्रिणींची वेळोवेळी गरज लागणारच. आता नाही तरी उतारवयात नक्कीच आपल्याला आजूबाजूला आपले स्वकीय असल्यास खूप सुरक्षित आणि शांत वाटेल यात शंका नाही. आयुष्य जगायला फक्त पैसा, प्रॉपर्टी उपयोगी नसून जीवाभावाची माणसे जास्त गरजेची आहेत. त्यामुळे आपली परिस्थिती ओळखून आपला स्वभाव लवचिक, मनमोकळा आणि आनंदी ठेवणे क्रमप्राप्त आहे. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहायचा, सगळ्यांच्या भाव-भावनांना किंमत देण्याचा घरातील अथवा बाहेरील लोकांना आदर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे अविवाहित महिलांना गरजेचे आहे. आपल्या नात्यातील लहान मुलं सुद्धा आपण प्रेमाने, मायेने जवळ करावीत. कारण आपल्याला जरी स्वतःच मूलबाळ नसलं तरी हिच मुलं आपल्याला उतारवयात साथ देण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आपण जे पेरलं ते उगवणार या निसर्ग नियमानुसार लहानपणापासून घरातील, कुटुंबातील मुलांना आपलंस करणं, त्यांना समजावून घेणं आपल्या हातात आहे.
भूतकाळात आपले कोणामुळे काय नुकसान झाले तेच उगाळत बसून आपण मनात अढी ठेऊन जर वागत राहिलात, तर जवळचे लोक लांब जायला वेळ लागणार नाही. आपण जोपर्यंत तब्येतीने, शरीराने, मनाने स्वावलंबी आहोत तोपर्यंत आपल्याला कोणाचीही गरज नाही अशी भूमिका जर ठेवली तर वेळप्रसंगी, आजारपणात, म्हातारपणी आपल्याला जगणे मुश्कील होईल यात शंकाच नाही. शक्यतो अशा एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांनी कोणाचीही सतत निंदा करणे, अपमानित करणे, वादविवाद अथवा भांडणे करणे, कोणाचेही मानसिक खच्चीकरण करणे पूर्णतः चुकीचे आहे. असे केल्यामुळे लोक तुमच्या या वागणुकीचा, अशा स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि तुमचे वीक पॉइंट्स इतरांना कळल्यामुळे तुम्हाला त्रास देणे त्यांना अतिशय सोपे जाते.
स्वतःमध्ये आमूलाग्र अांतरबाह्य बदल, हसरा-आनंदी चेहरा, संयम, शांतता हे कोणाचेही मन जिंकायला मदत करणारे गुण आहेत. सगळ्यांशी चांगलं वागत असतानाच आपण खूप मजबूर, असाह्य आहोत असे प्रदर्शनपण करणे योग्य नाही. आपल्याला असलेला उत्पनाचा आधार, आपल्या हक्काची नावाची मालमत्ता, प्रॉपर्टी ही सांभाळून ठेवणे पण आवश्यक आहे. कोणाच्याही भावनिक अत्याचाराला बळी पडून आपला आर्थिक आधार गमावून बसू नका. अति गोड बोलणारे, प्रमाणापेक्षा जास्त जवळीक करणारे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून देखील सावध राहा. आपल्या सुख-दुःखाचे बाजारीकरण होऊ देऊ नका. आपल्याला आधार द्यायच्या बहाण्याने कोणी आपला वापर, आपलं आर्थिक शोषण करणार नाही याची पुरेशी काळजी नक्कीच घ्या. म्हातारपणासाठी आपले आर्थिक नियोजन करून ठेवा. यासाठी आधीपासूनच कोणताही व्यवहार हा सतर्कपणे समजून-उमजून करा. आपल्याकडे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे त्या संदर्भातील माहिती कोणालाही उपलब्ध करून देताना विचार करा. अति बडबड, अति राग, अथवा भावनेच्या भरात, आततायीपणा यामुळे आपण लोकांसाठी हास्यास्पद होणार नाही, आपल्या मागे कोणी आपली निंदा, बदनामी करणार नाही यासाठी सतर्क राहा.
विश्वास आणि आंधळा विश्वास यातील फरक ओळखून अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि जवळील माणसांचेच सल्ले घेणे, जो सल्ला घेताय त्यातील तज्ज्ञ माणसाचाच सल्ला घेणे या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. समाजात वावरताना, नोकरीत, व्यावसायिक ठिकाणी अथवा कुटुंबात वावरताना सुद्धा आपली मानसिकता, वागणूक प्रामाणिक, सभ्य, निर्मळ असू द्या. आपल्यामुळे कोणाला त्रास, अडथळा होणार नाही यावर लक्ष द्या, कोणाच्या खासगी आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नका. कोणालाच मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. आपण जर नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, तर आपल्या सेवानिवृत्तीनंतरच नियोजन आधीच करून ठेवा. घरातल्यांना तशी कल्पना विश्वासात घेऊन द्या. आपण कोणत्याही संस्था, संघटना, सामाजिक अथवा आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून देणार असाल, तर त्याबाबत देखील आपले दिनक्रम, उपक्रम काय असतील यावर विचार करा. आपलं शरीरच नाही तर मन सुद्धा कसे निरोगी राहील, यावर भर द्या. आपली प्रकृती सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आपला कोणाला बोज वाटणार नाही, आपल्यामुळे कोणी कंटाळणार नाही, वैतागणार नाही हे कटाक्षाने लक्षात असू द्या. वेळोवेळी आपल्या वैद्यकीय चाचण्या करून घेणे, डॉक्टरचे सल्ले घेऊन, योग्य आहार-विहार करून स्वतःला निरोगी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तरुण अविवाहित महिला ही पुरुषांना सहजासहजी उपलब्ध होणारी, लैंगिक गरजा पूर्ण करणारी, करमणूक करणारी पर्यायी व्यवस्था वाटते, तिच्या मनाशी, भावनांशी कोणालाही काहीही घेणे-देणे नसते असे अनुभव आपल्याला सर्रास येत असतात. त्यामुळे सामाजिक माध्यमातून आपण अविवाहित असल्याची, एकटेच राहत असल्याची माहिती, बिनधास्त असल्याचे संकेत शक्यतो देऊ नका. लोकांचे लक्ष वेधले जाईल अशा पोस्ट, असे विचार शक्यतो पूर्ण अभ्यास करूनच टाका. पुरुषांचा गैरसमज होईल असे आपले वैयक्तिक फोटो, व्हीडिओ, कविता, चारोळ्या, गाणी समाज माध्यमातून शेअर करणे टाळणे योग्य राहील. कोणाच्याही पोस्टवर प्रतिक्रिया देताना देखील कोणी आपला अविवाहित असण्याचा मुद्दा आणि त्यामुळे आपल्या अनुभवातून आपली बनलेली मते म्हणजेच ही प्रतिक्रिया आहे, असा संदर्भ लावणार नाही याची योग्य ती खात्री करावी.
आजकाल लोकांना इतरांबद्दल वरवरच उथळ मत बनविण्याची इतकी घाई असते की, कोणाबद्दल काहीही माहिती नसताना त्यांच्यावर सर्रास टीका केली जाते, कोणावरही खुलेआम चर्चा करणे, विशेतः महिलांवर विविध शेरे मारणे, महिलांना त्यांच्या राहणीमान, स्वभाव, वागणुकीवरून टोचत राहणे असे प्रकार तीच मनोधैर्य खचवायला अनेक जण करीत असतात.
त्यामुळे आपल्याला कोणी चुकीचे समजणार नाही, आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरून आपली सामाजिक बदनामी होणार नाही, कोणाच्याही दबावाला, ब्लॅकमेलींगला, चुकीच्या मागण्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही अशी खंबीर आणि खमकी भूमिका ठेवावी. आपल्याभोवती सतत आत्मविश्वासाचे, नीतिमत्तेचे वलयं असल्यास कोणीही आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास देणार नाही.