Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीमनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल

२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीने बनवले आरोपी

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी ठरवले आहे. ईडीने जॅकलिन विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या मते, सुकेश चंद्रशेखर हा ठग असून तो खंडणीखोर असल्याचे जॅकलिनला सुरुवातीपासूनच ठाऊक होते.

वृत्तानुसार, जॅकलिन आणि कॉनमन सुकेश रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ईडीने जॅकलिनची चौकशी केली आणि दोघांचे फोटो पुरावे म्हणून सादर केले.

ईडीच्या रिपोर्टनुसार, जॅकलिनने चौकशीदरम्यान सांगितले की, मी सुकेशकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या होत्या. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. सुकेशने मला हि-याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या रिंगमध्ये जे आणि एस बनवले होते. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा घोडा, गुच्चीच्या ३ डिझायनर बॅग, गुच्चीच्या ३ जिम वेअर, लुई विटॉचे एक जोडी शूज, २ जोडी डायमंड कानातले आणि एक रुबी ब्रेसलेट, दोन हेमीज ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कारचा समावेश आहे.

ईडीच्या चौकशीत सुकेशने सांगितले होते की, मी जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. म्हणूनच मी तिला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या प्रकरणाशी जॅकलिनचा काहीही संबंध नाही, असेही सुकेशने आपल्या वक्तव्यात म्हटले होते.

अभिनेत्रीचे सुकेशसोबतचे खासगी फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर जॅकलिनने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका, असे आवाहन केले होते. तिने लिहिले होते, ‘या देशाने आणि येथील जनतेने मला नेहमीच प्रचंड प्रेम आणि आदर दिला आहे. यात माझ्या मीडिया मित्रांचाही समावेश आहे. मी तुमच्या सर्वांकडून काहीतरी शिकले आहे. सध्या मी कठीण काळातून जात आहे. मी मीडियातील माझ्या मित्रांना विनंती करते की, असे फोटो प्रसारित करू नका, जे खासगी आहेत आणि माझ्या प्रायव्हसीत बाधा आणणारे आहेत. आपण आपल्या प्रियजनांसोबत असे करत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत असे करणार नाही असा माझा विश्वास आहे. मलाही लवकरच न्याय मिळेल अशी आशा आहे,’ अशा आशयाची पोस्ट जॅकलिनने लिहिली होती.

सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहे. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या १७व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले.

सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. २००७ मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात १०० हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती. यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

तामिळनाडूमध्ये तो स्वत:ला माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा असल्याचे सांगत होता. त्याने स्वत:ला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा पुतण्या असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -