नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेने आपला व्यवसायिक दृष्टिकोन बदलत नाशिक, मनमाड, भुसावळ, जळगाव आदी परिसरातील प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ देवळाली पॅसेंजर पुन्हा एकदा सुरू होत आहे. मात्र आता ही गाडी पॅसेंजर न राहता एक्सप्रेस झाल्याने प्रवास भाडे महागणार असल्याने प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे.
मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच प्रवासी रेल्वे गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही अनेक रेल्वे गाड्या थांबत आहेत. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशी, शेतकऱ्यांना सोयीस्कर असणारी आणि आर्थिक चक्र गतिमान करणारी भुसावळ पॅसेंजर गाडी गेल्या अडीच वर्षापासून बंद आहे. दरम्यान याबाबत आनंदाची बातमी असून लवकरच ही गाडी सुरु होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला असून देवळाली-भुसावळ रेल्वे येत्या १६ सप्टेंबर पासून सुरु करीत आहेत. मात्र आत गाडीला पॅसेंजर ऐवजी एक्सप्रेसचा दर्जा देऊन देवळाली भुसावळ देवळाली प्रवासी रेल्वे एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीला ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा असून एक्सप्रेसचा दर्जा असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास महागणार आहे. येत्या १६ सप्टेंबरपासून भुसावळून देवळालीकडे तर सप्टेंबर तर १७ सप्टेंबर पासून देवळालीहून भुसावळकडेही एक्सप्रेस धावणार आहे.
दरम्यान या गाडीला १२ डबे असून दहा डबे प्रवासी तर दोन डबे मालवाहतुकीसाठी असणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडी क्रमांक ११११४ भुसावळ देवळाली एक्सप्रेस भुसावळ स्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता सुटून जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, पानेवाडी, मनमाड, लासलगाव, निफाड, कसबे सुकेने, खेरवाडी, नाशिकरोड आणि देवळालीला पोहोचणार आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही एक्सप्रेस देवळाली स्टेशनवर पोहोचेल. त्यानंतर देवळाली स्थानकातून सुटणारी गाडी क्रमांक ११११३ ही सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटेल. त्यानंतर ती दुपारी सव्वा बाराच्या सुमारास भुसावळला पोहोचेल.
कोरोना काळात बंद असलेली भुसावळ देवळाली पॅसेंजर अखेर सुरु होणार असून येत्या १६ सप्टेंबरपासून ती या मार्गावर धावणार आहे. मात्र या पॅसेंजरचे एक्सप्रेसमध्ये रूपांतर झाल्याने प्रवास भाडे वाढले आहे. जवळपास तिप्पट भाडे वाढणार असून यामुळे प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागणार आहे. ही गाडी सुरुवातीला पॅसेंजर होती, मात्र आता एक्सप्रेस झाल्याने जवळपास तिप्पट भाडे द्यावे लागणार आहे.