सिन्नर (प्रतिनिधी) : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी दोन पोल्ट्री फार्मवर हल्ला करून त्यातील पन्नास कोबड्यांना ठार केल्याची घटना येथील उपळी परिसरात, तर दुसरी घटना घडली. टेंभूरवाडी परिसरात ठाणगाव येथील गट नंबर १२८९ मध्ये अशोक तुकाराम शिंदे यांच्या मालकीचे घर असून, घराशेजारील कोंबड्यासाठी शेड बांधलेले आहे.
‘लेयर’ जातीच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या पाळलेल्या आहेत. बुधवारी (दि. १७) पहाटे दोन वाजेच्या सुमारास शेडमध्ये कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने शिंदे यांचा मुलगा किरण याने शेडकडे जाऊन बघितले असता, त्याला एक बिबट्या व दोन बछडे दिसले. त्यानंतर त्याने आजूबाजूच्या लोकांना उठवून आवाज करून व बॅटरीच्या साहाय्याने बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात बिबट्याने शेडमधील जवळपास पन्नास कोबड्या ठार केल्या. उपळी परिसरातील लोक जास्त संख्येने जमा झाल्याने बिबट्याने आपला मोर्चा टेंभूरवाडी परिसरातील पेट्रोलपंपाच्या बाजूला असणाऱ्या संपत पाटोळे यांच्या पोल्ट्रीकडे वळविला. पाटोळे यांच्या पोल्ट्रीमधून वीस कोबड्यांचा फडशा पाडून पहाट होताच बिबट्याने आपला मोर्चा परिसरात वळविल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. एका रात्रीत बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी चाळीस ते पन्नास कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. वनविभागाच्या वतीने घटनास्थळी पाहणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.