नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी चार वर्षांत क्रिकेट चाहत्यांकरिता पर्वणीच आहे. या चार वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होणार आहेत. आयसीसीने २०२३ ते २०२७ या चार वर्षांतील पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. यात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. या यादीत भारताचा सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत समावेश आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात १३७ कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ टी-२० असे ७७७ सामने आहेत. हे सामने चार वर्षांत होणार आहेत.
आयसीसीच्या मागच्या एफटीच्या तुलनेत यंदा ८३ सामने अधिक खेळवले जाणार आहेत. या चार वर्षांत मोठ्या स्पर्धांचाही समावेश आहे. ज्याची सुरुवात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापासून होईल. त्यानंतर २०२४ चा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे संयुक्तपणे होणार आहे. याशिवाय, २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तामध्ये, २०२५ चा टी-२० विश्वचषक भारतात आणि दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे २०२७ चा विश्वचषक स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करतील.
भारत-ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची कसोटी मालिका
आयसीसीच्या नव्या एफटीपीनुसार, भारताचा सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांमध्ये समावेश आहे. १८ ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत भारत ४४ कसोटी, ६३ एकदिवसीय आणि ७६ टी-२० सामने खेळणार आहे. २०२३ मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पाच-पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची ही ३० वर्षांतील पहिलीच वेळ असेल. यापूर्वी १९९२ मध्ये दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती.