Tuesday, May 20, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

उद्या सकाळी ११ वाजता ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे रहा; 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' होणार

मुंबई : देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पतंप्रधानांनी हर घऱ तिरंगा हे अभियान राबवले होते याला चांगला प्रतिसाद देशभरातून मिळाला होता. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले आहे. यासाठी सरकारी परिपत्रकच काढण्यात आले आहे.


बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे. याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती देताना सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Comments
Add Comment