सीमा दाते
लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक येणार आहे. मात्र निवडणुकीआधी मुंबईत शिंदे गट सक्रिय झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. आधीच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा भाजप विरुद्ध शिवसेना लढत असणार आहे. त्यातच शिंदे गट तयार झाल्यामुळे या निवडणुकीत शिंदे गट देखील असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी असण्याची शक्यता आहे.
सध्या मुंबईत शिंदे गटाचे दादर येथे मुख्यालय करणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून दिली, तर पहिले शिंदे गटातील शाखेचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईत ठिकठिकाणी अशा प्रकारेच्या शिंदे गटाच्या शाखा दिसणार आहेत. या आधी मुंबईत शिवसेनेचे शाखा होत्या, मुंबईतील विभाग विभाग शिवसेनेच्या शाखा आहेत. शिवसेना या शाखेच्या माध्यमातून लोकांच्या घराघरांत पोहोचली आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या देखील शाखा सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून सुरू आहे. शिंदे गटाची मानखुर्द येथे पहिली शाखा सुरू झाली असून आता मुंबईतील विभाग विभागांत शिंदे गटाच्या शाखा सुरू होणार आहेत.
मुंबई महापालिकेआधी आता शिंदे गट चांगलाच सक्रिय दिसणार आहे. आधीच मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे या शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. त्यानंतर शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणाकर आणि शिंदे गटात सामील झालेल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे पती आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे अधिकृत शिंदे गटात सामील झाले नसतील तरी शिंदे गटातच असल्याच्या चर्चा आहेत. तसेच शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीला गैरहजर होते. यामुळे आता हे तीन नगरसेवक शिंदे गटात असून याच्याकडूनही पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका पडण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव हे चार वेळा पालिकेतील स्थायी समिती पदावर होते, तर ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांचा गट त्यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर शिवसेनेकडून अद्याप तरी कोणतीही अॅक्शन घेण्यात आली असल्याचे पाहायला मिळत नाही, तर यशवंत जाधव यांच्याबाबत शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान आता शाखेच्या माध्यमातून शिंदे गट पालिका निवडणुकीआधी सक्रिय होत असून पक्ष बांधणीसाठी तयारी करेल असे दिसत आहे, तर शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येत आहेत, दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवक गैरहजर होते यात (बंडखोर माजी नगरसेवक वगळून) १३ माजी नगरसेवक गैरहजर होते, तर काही नगरसेवक मुंबई बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाहीत, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले, तर यात माजी नगरसेविका व माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या पतीची प्रकृती ठीक नसल्याने त्या हजर राहू शकल्या नाहीत. तसेच, राजूल पटेल यांना रुग्णालयात जावे लागल्याने त्याही हजर राहू शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे चित्रा सांगळे, अर्चना भालेराव, शुभदा गुडेकर यांची तब्येत ठीक नसल्याने त्या हजर राहू शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे आशीष चेंबूरकर, अमेय घोले हे सुद्धा काही कारणास्तव हजर राहू शकले नसल्याचे समजते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील यशवंत जाधव, वैशाली शेवाळे, शीतल म्हात्रे, आमदार व माजी नगरसेवक दिलीप लांडे, समाधान सरवणकर हे देखील बैठकीला गैरहजर होते. यामुळे आता शिवसेनेला वेगळ्याच आवाहनाला सामोरे जावे लागणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत लढण्याची तयारी, शिंदे गटापासून आपल्या नगरसेवकांना थांबवणे आणि शिंदे गट, भाजप यांना पालिका निवडणुकीला सामोरे जावे अशी आवाहने शिवसेनेसमोर आहेत.
तर मुंबईतील पाच आमदार शिंदे गटात सहभागी असल्यामुळे शिंदे गट जोरदार तयारी करत आहे. त्यातच आता पहिली शाखा खासदार आणि शिवसेना शिंदे गटातील लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी सुरू केली आहे. राहुल शेवाळे खासदार असून सायन, चेंबूर, धारावी, माटुंगा, वडाळासारखा परिसर त्यांच्या अंतर्गत येत आहे, तर पालिकेतही ते स्थायी समिती पदावर होते. त्यामुळे या नवीन सुरू झालेल्या शाखांमुळे शिंदे गटाला फायदा आणि शिवसेनेला तोटा होण्याची शक्यता आहे.